Donald Trump on India pakistan पापा ने व्यापार बंद करने की धमकी देकर वॉर रुकवा दी!

अमेरिका के पापा ने व्यापार बंद करने की धमकी देकर वॉर रुकवा दी… हे सत्य अखेर जगापुढे आले आहे. खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच हा दावा आज केला. हिंदुस्थान-पाकिस्तानने युद्ध थांबवले नाही तर अमेरिका दोन्ही देशांसोबत कोणताही व्यापार करणार नाही, असे सांगताच युद्ध थांबले, असे ट्रम्प म्हणाले. दोन्ही देश अणुयुद्धाच्या उंबरठय़ावर होते मात्र माझ्यामुळे हे अणुयुद्ध टळले, असेही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सांगितले.
अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर शनिवारी हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला. या शस्त्रसंधीची घोषणा सर्वात आधी ट्रम्प यांनीच एक्स पोस्टमधून केली. त्यावरून मोदी सरकारवर टीका होत आहे. या संघर्षात अमेरिकेने हस्तक्षेप का केला, तो हस्तक्षेप आपण मान्य का केला, असा सवाल अनेक माजी लष्करी अधिकाऱयांनीही विचारला आहे. त्यात ट्रम्प यांनी आज पुन्हा एकदा जाहीरपणे आपल्या इशाऱयानंतरच युद्ध थांबल्याचा दावा माध्यमांसमोर येऊन केला.आम्ही दोन्ही देशांना खूप मदत केली. व्यापारातही मदतीचा हात दिला. यापुढेही अधिक व्यापार आम्हाला तुमच्यासोबत करायचा आहे. त्यासाठी आपल्याला युद्ध थांबवावं लागेल. तरच व्यापार पुढे सुरू ठेवता येईल. तुम्ही युद्ध थांबवले नाही तर आम्हाला तुमच्यासोबत कोणताही व्यापार करणार नाही, असे मी दोन्ही देशांना सांगितले आणि त्यांनी ते म्हणणे ऐकले, असे ट्रम्प म्हणाले. दोन्ही देशांचे नेतृत्व शक्तिशाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य त्यांनी ओळखले. समजूतदारपणा, शहाणपणा आणि धैर्य दिसले. शनिवारी माझ्या प्रशासनाने तात्काळ शस्त्रविराम करण्यास मदत केली, मला वाटते की हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये कायमस्वरूपी शस्त्रविराम होईल, असेही ट्रम्प पुढे म्हणाले.
या दोन्ही देशांकडे भरपूर अण्वस्त्रs आहेत. आमच्यामुळे एक अणुयुद्ध टळले आहे. मला वाटते हे एक भयंकर अणुयुद्ध असू शकले असते. लाखो लोक मारले गेले असते. मी उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि परराष्ट्र सचिव माका&s रुबियो यांचेही त्यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल आभार मानू इच्छितो, असे ट्रम्प यांनी नमूद केले.
यह है असली विश्वगुरू- संजय राऊत
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्रम्प यांच्या या विधानानंतर मोदी सरकारचा समाचार घेतला. ‘पापा ने व्यापार बंद करने की धमकी देकर वॉर रुकवा दी! ये ही है असली विश्वगुरू! बाकी सब नकली!’ असा टोला संजय राऊत यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून हाणला.
मोदी उत्तर द्या – काँग्रेस
ट्रम्प यांचा दावा देशाला अस्वस्थ करणारा आहे. व्यापार थांबवण्याच्या धमकीला घाबरून आपण युद्ध थांबवले असेल तर ही गंभीर बाब आहे. हिंदुस्थानी संस्कृतीत पुंकवाचा असा सौदा कदापि मान्य केला जाऊ शकत नाही. मोदींनी यावर देशाला स्पष्टीकरण द्यायला हवे. कोणत्या अटी आणि शर्थींवर ही मध्यस्थी झाली, हे कळायलाच हवे, अशी मागणी काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केली.