दिवसा रुग्णसेवा अन् रात्री यूपीएससीची तयारी, डॉ. अक्षिता गुप्ताची प्रेरणादायी कहाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल तर मेहनतीला शिस्तीची आणि आत्मविश्वासाची जोड हवी. डॉ. अक्षिता गुप्ताच्या कहाणीतून हीच प्रेरणा मिळते.

हरयाणाची डॉ. अक्षिता गुप्ता यूपीएससीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 69 वा रँक मिळवून यशस्वी झाली. पंचकुला येथे राहणाऱया अक्षिता चंदिगड मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस करत होती, तेव्हापासून तिने यूपीएससीची तयारी सुरू केली होती. हॉस्पिटलमध्ये काम करताना ती यूपीएससीची तयारी करण्यासाठी वेळ काढत होती. ब्रेकमध्येही ती खिशात नोट्स ठेवून अभ्यास करत असायची. एकीकडे एमबीबीएसचा अभ्यास, प्रॅक्टिकल शिक्षण आणि दुसरीकडे यूपीएससीची तयारी सुरू ठेवली. तिची ही मेहनत आणि चिकाटी तिला तिचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पुढे नेत होती.

अखेर स्वप्नपूर्ती झाली…

मेडिकल इंटर्नशिपमध्ये हॉस्पिटलमधील धावपळ, रुग्णांची जबाबदारी आणि शिफ्टनुसार डय़ुटी हे सगळे सांभाळून तिने अभ्यास सुरू ठेवला. हॉस्पिटलमध्ये छोटय़ा छोटय़ा ब्रेकमध्येही ती अभ्यासावर लक्ष देत होती. वेळ वाचवण्यासाठी तिने आवश्यक नोट्स तिच्या खिशातच ठेवत होती. तिच्याकडे पुस्तकांची पाने असायची. वेळ मिळाल्यावर लगेच ती वाचायची. अनेकदा अक्षिताची शिफ्ट 12 ते 14 तासांची असायची. इतका वेळ काम करूनही थकवा न घेता तिने शिक्षण सुरूच ठेवले. नोकरी न सोडता, अनेक आव्हानांना सामोरे जात अक्षिताने यूपीएससी पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली.