
>> डॉ. जयंत वडतकर
पूर्वी शहरात अनेक पक्षी सर्रास दिसत असत. मात्र गेल्या काही वर्षांत त्यातील असंख्य पक्षी दिसेनासे झाले आहेत. त्याच वेळी काही पक्ष्यांची संख्या अतोनात वाढली आहे. सध्या मुंबईत वादंग माजलेली कबुतरे हे अतोनात वाढलेल्या शहरी पक्ष्यांपैकीच एक. मानवी आरोग्यासाठी घातक असणारी कबुतरे मोठय़ा संख्येने वाढण्याचे एक कारण आहे ते पर्यावरणीय असंतुलन आणि दुसरे आहे ते धार्मिक तसेच भूतदयेची भ्रामक कल्पना. त्यानिमित्त पर्यावरणीय असंतुलन आणि त्यामुळे शहरी पक्ष्यांचा बिघडलेला समतोल याचा आढावा घेणारा लेख.
डोडो या पक्ष्याचे उदाहरण आपण कधीतरी अभ्यासात शिकलो किंवा कुठेतरी वाचलेले असते. हा पक्षी या पृथ्वीतलावरून नष्ट झाला तो सुमारे 15 ते 16 व्या शतकात. याचे अस्तित्व संपुष्टात येण्याचे मुख्य कारण म्हणजे या बेटावर मानवाचे पडलेले पाऊल. मॉरिशस बेटावर माणूस कधीच नव्हता. मानव तिथे पोहोचला. सोबत कुत्रेही घेऊन गेला. सहज पकडला जात असल्याने हा पक्षी हळूहळू संपला. डोडो प्रजाती नष्ट होण्याची ही झाली अर्धी गोष्ट. हा पक्षी संपला म्हणून तेथील एका झाडाची संख्या पुढील शतकात झपाटय़ाने कमी होत गेली. डोडो पक्ष्याने या झाडाच्या बिया खाल्ल्या तरच त्या रुजत असत. हा पक्षी संपल्याने या झाडाची नवीन उत्पत्ती थांबली. झाडाची संख्या झपाटय़ाने कमी होत गेली.
पर्यावरणीय संतुलन बिघडले तर काय होऊ शकते? एखादी प्रजाती नष्ट होऊ शकते, अन्न साखळी बिघडते, एखादी शिकारी प्रजाती जास्त वाढली तर भक्ष्य असलेली प्रजाती नष्ट होऊ शकते. एखाद्या प्रजातीचे अन्न संपले तर त्यावर जगणारी प्रजातीसुद्धा नष्ट होऊ शकते. हल्ली अनेक ठिकाणी हे संतुलन बिघडले असून जैवविविधतेतील अनेक घटक नष्ट होताहेत, तर काही वाढत आहेत. विविध अधिवासात त्याचे परिणाम दिसत आहेत, तसेच अर्बन बायोडायव्हर्सिटीमध्येसुद्धा त्याचे परिणाम दिसून आले आहेत. पूर्वी गावात किंवा शहरात, मानवी वस्तीभोवती चिमणी, कावळे, भोरी, ठिपकेवाला होला, कबुतर, मैना, साळुंखी, बुलबुल, कोकीळ, वटवटय़ा, शिंपी, शिंजीर, सातभाई, बगळे, गटारी बगळे, कोतवाल, पोपट व मोर आणि काही शिकारी पक्ष्यांपैकी शिक्रा, घार व डबक्यात दिसणाऱ्या पानकोंबडय़ा हे पक्षी सर्रास दिसायचे. गेल्या काही वर्षांत मात्र यातील अनेक पक्षी दिसेनासे झाले आहेत, तर काहींची संख्या मात्र अतोनात वाढलेली आहे.
पूर्वी पोपट फक्त रात्रीच्या वेळी शहरात यायचे. शहरातील एखाद्या मोठय़ा-जुन्या झाडावर त्यांचा रातथारा असायचा. हजारो पोपट त्या झाडावर रात्री मुक्काम करायचे. रात्रभर त्यांचा कलकलाट चालायचा. दिवस उजाडला की आपल्या खाद्याच्या शोधत ते जंगलाकडे निघून जायचे. अलीकडे मात्र काही शहरात पोपट दिवसभर दिसतात. तसेच फळझाडांची संख्या वाढल्याने कोयल पक्ष्याची संख्यासुद्धा वाढलेली दिसून आली आहे.
गेल्या काही दिवसात मुंबई शहरातील कबुतरखान्याचा विषय सर्वत्र चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईसह अनेक मोठय़ा शहरात कबुतरांची संख्या अतोनात वाढली आहे. या वाढलेल्या संख्येचा फटका सर्वप्रथम बसला तो शहरातील पक्ष्यांच्या विविधतेला. शहरातून चिमण्यांची संख्या कमी झाल्याची चर्चा आजपासून सुमारे 20 वर्षांपूर्वी प्रथम सुरू झाली होती. त्यावेळी त्याची जबाबदारी आपण मोबाईलच्या ध्वनिलहरीवर ढकलून मोकळे झालो होतो. कबुतरांच्या वाढत्या संख्येने, त्यांच्या आक्रमक व निडर स्वभावाने, मोठय़ा आकाराने त्यांनी इतर पक्ष्यांना हाकलून लावले. त्यांच्या निवाऱ्याच्या जागा, अन्न त्यांनी काबीज केले.
कबुतरे ही मुळात जंगलीच होती. ती डोंगराळ भागात कडेकपारीत राहत असत. आजसुद्धा काही ठिकाणी अशी जंगली कबुतरे दिसतात. तेथे त्यांची संख्या नियंत्रित असते, कारण त्यांना निसर्गात स्वतला संघर्ष करून जगावे लागते. कधीकाळी मानवाने कबुतरांना पाळीव केले. ते शहरात राहू लागले, आज शहरात वाढलेली संख्या ही त्यांचीच वंशज असून ते मानवी वस्तीत राहण्यास सरावलेले आहेत. अलीकडे शहरात निर्माण होत असलेल्या उंच इमारती ही संख्यावाढीचे आणखी एक कारण. अशा उंच इमारती त्यांना घरटय़ासाठी सुरक्षित जागा पुरवतात. दुसरे कारण म्हणजे भूतदयेच्या भ्रामक कल्पनेपायी त्यांना मोठय़ा प्रमाणात धान्य टाकले जाते. मुंबईतील दादर असो की गेट वेसमोरील पटांगण, या ठिकाणी त्यांना लोक मोठय़ा प्रमाणात धान्य टाकतात. अलीकडे हे प्रमाण खूपच वाढलेले आहे. कबुतरे ते कायम खातानाच दिसतात. पण ते कबुतरांच्या पचनी पडत नाही. अजीर्ण होऊन अनेक कबुतरे मारतातसुद्धा.
एखाद्या प्राण्यांची एकाच ठिकाणी संख्या वाढली की रोगराई पसरण्याचा धोका वाढत असतो. तो त्यांच्यासाठी व त्या परिसरातील इतरांसाठी सुद्धा धोकादायक असतो. कबुतरांमुळे अलीकडे अनेक आजार पसरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या विष्ठेमुळे वाढणाऱ्या एका बुरशीने रोग पसरू लागले आहेत. तर त्यांच्या पंखातील तंतूमुळे श्वसनाचे रोग होऊ लागले आहेत. त्यांच्या विष्ठेमुळे घाण होते व दुर्गंधी पसरते तसेच जास्तीचे टाकलेले अन्न सडूनसुद्धा दुर्गंधी व बुरशी पसरत असते. त्यामुळे शहरातील वाढत्या कबुतरांच्या संख्येवर तातडीने नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रथम त्यांना धान्य टाकण्याच्या जागा बंद करायला हव्यात. आपल्या घरावर जर ते घरटे करीत असतील तर त्या जागा बंद कराव्यात म्हणजे ते तेथून हळूहळू निघून जातील. निसर्गाने प्रत्येक पक्ष्याला आपले अन्न निसर्गात शोधण्याचे कसब व त्याचे अन्न उपलब्ध करून दिले आहे. जे आपले अन्न शोधण्यासाठी प्रयत्न करतील. पर्यावरण अन्न साखळीत जितकी कबुतरे आवश्यक आहेत तितकी निश्चितच जगतील यात काही शंका नाही.
पूर्वी आपल्या देशात पक्ष्यांच्या संख्येचा अभ्यास करण्याची नियमित अशी शास्त्राrय यंत्रणा नव्हती, बीएनएचएस ही संस्था मात्र काही ठिकाणी व काही पक्ष्यांचा शास्त्राrय अभ्यास सातत्याने करीत असली तरी संपूर्ण देशातील पक्ष्यांच्या संख्येतील चढ उतार समजणे शक्य नव्हते. मात्र गेल्या दोन शतकात ‘ईबर्ड’सारख्या संकेतस्थळामुळे पक्ष्यांचा बदलता कल समजणे शक्य झाले आहे. दोन वर्षापूर्वी भारतातील पक्ष्यांच्या स्थितीचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार गेल्या 8 वर्षांत 64 प्रजाती झपाटय़ाने कमी झाल्याचे दिसून आल्याचे दिसून आले असून 11 प्रजातींची संख्या झपाटय़ाने वाढल्याचे दिसून आले आहे. आपल्या राष्ट्रीय पक्षी मोराची संख्या गेल्या 20 वर्षांत संपूर्ण देशात दीडशे टक्क्याने वाढल्याचे हा अहवाल सांगतो. वरवर बघता ही वाढ सुखावणारी बाब वाटत असली तरी दुर्दैवाने ते काही चांगले चिन्ह म्हणता येणार नाही. त्यांच्या वाढीमागे जंगलाचा होणारा ऱहास, त्यांची शिकार करणारे कोल्हे, लांडगे यांची कमी होत असलेली संख्या ही कारणे दिसून येतात. त्यांच्या अचानक संख्या वाढीमुळे त्यांच्या खाद्य प्रजाती, जसे की साप, सरडे, बेडूक यासारखे लहान आकाराचे प्राणी संकटग्रस्त होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
(लेखक महाराष्ट्र पक्षिमित्र संथेचे अध्यक्ष आहेत.)




























































