
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या श्वान निर्बिजीकरण केंद्राची दुरवस्था झाली आहे,. केंद्राची इमारत मोडकळीस आली आहे, भिंतींना तडे गेले आहेत, खोलीतील फरशा उखडल्या असून श्वानांच्या पिंजऱ्यांना गंज लागलेला आहे. धोकादायक इमारतीतील केंद्रामुळे श्वानांचे हाल होत असल्याची तक्रार प्राणीप्रेमींनी केली आहे.
कल्याण पश्चिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला केडीएमसीच्या जीर्ण इमारतीत श्वान निर्बिजीकरण आहे. केंद्राच्या शेजारीच मोठा नाला असून पावसात त्या नाल्यालगतची संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळे पावसाचे पाणी थेट केंद्रात शिरले होते. अशा वेळी श्वानांना वाचवण्यासाठी पिंजरे उंचीवर ठेवण्याची तसेच काही वेळा एकमेकांवर रचण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली होती. केंद्राच्या दुरवस्थेसह निर्बिजीकरण केंद्राच्या कामकाजातही अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी प्राणीप्रेमी व्यक्त करत आहेत. भटके श्वान पकडण्यासाठी केंद्राकडे केवळ एकच वाहन असल्यामुळे भटक्या श्वानांची संख्या वाढत आहे.
दोन नवीन केंद्रे तयार करा!
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे श्वान निर्बिजीकरण केंद्र अपुरे आहे. तातडीने या केंद्राची दुरुस्ती करावी तसेच कुत्र्यांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली पश्चिम विभागात दोन स्वतंत्र केंद्रे तयार करावीत, अशी मागणी प्राणीमित्र नीलेश भणगे यांनी पालिकेकडे केली आहे.