
कल्याण, डोंबिवलीतील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी घोटाळ्याची केडीएमसीने चौकशी सुरू केली होती. यामध्ये आरोग्य विभागाचा एक कर्मचारी दोषी आढळून आला आहे. श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया आणि लसीकरण करण्याच्या कामात अनियमितता आढळून आल्याने कमलेश सोनावणे याला पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज निलंबित केले.
पालिका क्षेत्रातील मोकाट श्वानांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व ल सीकरण करण्यासाठी पालिकेचे कल्याण बाजार समितीजवळ केंद्र आहे. या ठिकाणी भटक्या श्वानांना पकडणे व त्यांचे निर्बिजीकरण शस्त्रक्रिया, लसीकरण केले जाते. ही कामे जीवरक्षा अॅनिमल वेल्फेअर संस्थेमार्फत केली जातात. या संस्थेच्या कामात अनियमितता असल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी पालिकेकडे तक्रार केली होती. यानंतर पालिकेने संस्थेकडून खुलासा मागितला होता.
संस्थेच्या कामाचे दैनंदिन पर्यवेक्षक व नियंत्रण करण्याची जबाबदारी पालिकेचा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी कमलेश सोनावणे याच्यावर होती. मात्र त्याने कामात अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे गैरवर्तन आणि निष्काळजीपणाचा ठपका ठेवून पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी त्याला निलंबित केले आहे




























































