
एमआयडीसीतील एरोसोल या कपडा कंपनीला भीषण आग लागली. आगीमुळे प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट उठले. त्यामुळे अनेकांचा श्वास घुसमटला. कंपनीतील 60 कामगारांनी प्रसंगावधान राखून बाहेर पळ काढल्याने त्यांचे प्राण सुदैवाने बचावले.
एमआयडीसी फेज 1 मध्ये असलेल्या कापड प्रक्रिया करणाऱ्या एरोसोल या कंपनीला दुपारी अचानक आग लागली. ही आग पसरत गेली. त्यामुळे कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग लागली तेव्हा एरोसोल कंपनीत 60 कामगार काम करत होते. त्यांनी वेळीच गेटच्या दिशेने धाव घेतल्याने ते बचावले. कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाचे प्रमुख नामदेव चौधरी यांच्यासह अग्निशमन टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी सहा ते सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
50 सिलिंडर फुटले असते तर अनर्थ घडला असता
एरोसोलला लागलेली ही आग वेगाने पसरत होती. कंपनीत ठेवलेल्या 50 सिलिंडरपर्यंत ही आग पोहोचायला काही क्षणच उरले होते. अग्निशमन जवानांनी हे ५० सिलिंडर उचलून कंपनीबाहेर आणले. आणखी थोडा जरी वेळ झाला असता तर एकापाठोपाठ एक 50 सिलिंडरचे स्फोट होऊन अनर्थ घडला असता.