पायलटच्या रेस्क्यू ऑपरेशनची गुप्त माहिती लीक करणाऱ्या फितुराचा शोध सुरू; डोनाल्ड ट्रम्प यांचे पित्त खवळले, पत्रकारालाही दिली धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन हवाई दलाच्या जवानाला वाचवण्याच्या अत्यंत संवेदनशील मोहिमेची माहिती लीक झाल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पित्त खवळले आहे. अमेरिकन प्रशासनात कुणीतरी फितूर सक्रिय असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. तसेच या मोहिमेबाबत बातमी देणाऱ्या पत्रकाराने त्याचे सूत्र उघड करावेत अन्यथआ तुरुंगवास भोगण्यासाठी तयार रहावे, अशी धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे.

इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये 28 फेब्रुवारीपासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धा दरम्यान अमेरिकेचे एफ-15ई हे लढाऊ विमान इराणने पाडले होते. यातील एक पायलट सुखरूप बाहेर पडला, तर दुसरा इराणच्या भूमीवर अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी अमेरिकेने अत्यंत गुप्त मोहीम राबवली होती. मात्र ही मोहीम सुरू असताना एका संस्थेने त्याबाबत माहिती दिली आणि इराणला याचा सुगावा लागला. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला. या मोहिमेमबाबत माहिती देताना त्यांनी गुप्त माहिती लीक करणाऱ्याचा समाचार घेतला.

इराणमध्ये अडकलेल्या पायलटच्या रेस्क्यू ऑपरेशनची माहिती लीक करणाऱ्या फितुराचा आम्ही शोध घेत आहोत. त्या व्यक्तीमुळे ही मोहीमच संकटात सापडली नाही, तर इराणमध्ये अडकलेल्या जवानाच्या जीवालाही यामुळे धोका निर्माण झाला होता, असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले.

ज्या पत्रकाराने ही बातमी पहिल्यांदा दिली त्याने आपला स्त्रोत उघड करावा. अन्यथा त्याला तुरुंगात जावे लागेल. तसेच जोपर्यंत तो स्त्रोत उघड करत नाही तोपर्यंत त्याला तुरुंगातच रहावे लागेल, असा सज्जड दमही त्यांनी दिला. प्रशासनातील गुप्त माहिती बाहेर काढणाऱ्या व्यक्तीमुळे जवानाचा जीव धोक्यात आला होता. हे आम्ही सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पायलटच्या बजाव मोहिमेसाठी अमेरिकेने तब्बल 155 विमानांचा वापर केला. यात 4 बॉम्बर, 64 फायटर जेट्स, 48 रिफ्युएलिंग टँकर्स आणि 13 बचाव विमानांचा समावेश होता, अशी माहितीही ट्रम्प यांनी दिली. इराणच्या सैन्याला चकवा देण्यासाठी अमेरिकन सैन्याने खास युक्तीही वापरली होती. पायलटच्या स्थानाबद्दल चुकीची माहिती मिळावी असा प्रयत्न अमेरिकन सैन्याचा होता. मात्र मीडियामध्ये आलेल्या वृत्तामुळे यात अडथळा निर्माण झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.