
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी युरोपियन युनियनला 200 टक्के कर लावणार असल्याची धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, जर त्यांनी अमेरिकन व्हिस्कीवरील नियोजित कर कायम ठेवला तर युरोपमधून आयात होणाऱ्या मद्य, वाइन आणि शॅम्पेनवर 200 टक्के कर लावला जाईल. ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर कर लादण्याच्या घोषणेनंतर युरोपियन युनियनने अमेरिकन व्हिस्कीवर 50 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. युरोपियन युनियन 1 एप्रिलपासून हे कर लागू करणार आहे.
युरोपियन युनियनच्या या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जर युरोपियन युनियनने अमेरिकन व्हिस्कीवरील जाहीर केलेल्या 50 टक्के कर लागू केला तर, एक नवीन व्यापार युद्ध सुरू होईल.” ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “जर हा कर तात्काळ मागे घेतला नाही तर, अमेरिका लवकरच फ्रान्स आणि इतर युरोपियन युनियन देशांमधून येणाऱ्या सर्व वाइन, शॅम्पेन आणि अल्कोहोल उत्पादनांवर 200 टक्के कर लादेल.”