जेवढा कर आकाराल तेवढाच आमच्याकडूनही आकारला जाईल; डोनाल्ड ट्रम्प यांचा हिंदुस्थानला इशारा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानावर रेसिप्रोकल टॅक्स लावण्याचा इशारा दिला आहे. म्हणजे हिंदुस्थानने अमेरिकन उत्पादनांवर कर लावला तर आता ट्रम्पही हिंदुस्थानी उत्पादनांवर तेवढाच कर लावण्याची चर्चा करत आहेत. काही अमेरिकन उत्पादनांच्या आयातीवर हिंदुस्थानने लादलेल्या उच्च कराला प्रत्युत्तर म्हणून परस्पर कर लावण्याबाबत पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला.

डोनाल्ड ट्रम्प माध्यमांशी बोलताना म्हणाले की, हिंदुस्थान आमच्या उत्पादनांवर कर लावत असेल तर आम्हीही त्यांच्या उत्पादनांवर समान कर लावू. त्यांनी आमच्यावर कर लावला तर आम्ही त्यांच्यावर कर लावू. ते आमच्या उत्पादनांवर कर लावतात. जवळपास सर्वच उत्पादनांवर कर लावतात आणि आम्ही त्यांच्या उत्पादनांवर कर लावत नाही. अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनसोबतच्या संभाव्य व्यापार करारावरील प्रश्नाला उत्तर देताना ही टिप्पणी केली. ट्रम्प म्हणाले की, काही अमेरिकन उत्पादनांवर उच्च कर लावणाऱ्या देशांमध्ये हिंदुस्थान आणि ब्राझीलचा समावेश आहे.

ट्रम्प म्हणाले, परस्पर हा शब्द महत्त्वाचा आहे कारण जर कोणी आमच्यावर शुल्क आकारत असेल तर आम्हाला स्वतःबद्दल बोलण्याची गरज नाही – जर हिंदुस्थान आमच्याकडून 100 टक्के शुल्क आकारत असेल तर आम्ही त्यांच्याकडून काहीच शुल्क आकारू नये का? हिंदुस्थान आम्हाला सायकल पाठवतो आणि आम्हीही त्यांना सायकल पाठवतो. ते आमच्याकडून 100-200 रुपये घेतात. ट्रम्प पुढे म्हणाले, हिंदुस्थान आणि ब्राझील खूप शुल्क घेतात. जर त्यांना आमच्याकडून शुल्क आकारायचे असेल तर ते ठीक आहे. मात्र आम्हीही त्यांच्याकडून तेवढेच आकारणार आहोत. त्यांच्या बोलण्यावर वाणिज्य सचिवांनी मान्यता दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जो जसे करेल त्याच्यासोबत तसेच केले जाईल.

ट्रम्प यांनी निवडलेले अमेरिकेचे पुढील वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी सांगितले की, ट्रम्प प्रशासनातील रेसिप्रोसिटी हा एक महत्त्वाचा विषय असेल. जर देश-1 देश-2 वर कर लादत असेल, तर देश-2 त्यानुसार देश-1 वर कर लादू शकतो. त्या बदल्यात किती कर आकारावा लागतो हे देशावर अवलंबून असते.