अमेरिकेत एका दिवसात 700 उड्डाणे रद्द, ट्रम्प यांच्या शटडाऊनचा जोरदार फटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठेपणामुळे अमेरिकेतील शटडाऊनला आता 38 दिवस होत आहेत. हा शटडाऊन दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचा थेट परिणाम हवाई प्रवासावर होताना दिसत असून अमेरिकेत अवघ्या एका दिवसात 700 उड्डाणे रद्द करण्याची वेळ अमेरिकेवर आली आहे. फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने 40 प्रमुख विमानतळांवर उड्डाण कपातीची घोषणा केली. ही कपात शुक्रवारी सकाळपासून सुरू झाली.

एकूण 40 विमानतळांपैकी बहुतेक अमेरिकेतील सर्वात व्यस्त विमानतळ असलेले न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डीसीमधील प्रमुख विमानतळांचा समावेश आहे. अनेक प्रमुख विमान कंपन्यांनी आधीच उड्डाणे रद्द केली आहेत. आतापर्यंत 700 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ही कपात सध्या जास्त असली तरी उड्डाणे 14 नोव्हेंबरपर्यंत 10 टक्क्यांपर्यंत पोहोचतील. ही कपात सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. याचा परिणाम देशांतर्गत उड्डाणावर होईल. यामुळे दररोज 1,800 उड्डाणे रद्द होऊ शकतात, ज्यामुळे अंदाजे 2,68,000 लोक प्रभावित होऊ शकतात.

डेल्टा एअरलाइन्सने शुक्रवारी 170 उड्डाणे रद्द केली. युनायटेड एअरलाइन्सने 200 उड्डाणे रद्द केली. साऊथवेस्ट एअरलाइन्सने 100 उड्डाणे रद्द केली. अमेरिकेतील विमान कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी आम्ही सरकारसोबत काम करत आहोत. कोणती उड्डाणे रद्द करायची हे एअरलाइन्स ठरवतील, असे एफएएने म्हटले आहे. 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेला अमेरिकन सरकारी बंद हा अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा बंद आहे.

प्रवाशांसाठी सूचना

अमेरिकेतील प्रमुख विमान कंपन्यांनी पुढील 10 दिवसांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. पुढील 10 दिवसांत विमान प्रवास करत असाल तर बॅकअप तिकीट बुक करा. दुसऱया एअरलाइन्सवर इकॉनॉमी क्लासमध्ये स्विच करा. हे बदल मोफत आहेत, असे फ्रंटियर एअरलाइन्सचे सीईओ बॅरी बिफल यांनी इन्स्टाग्रामवर सांगितले. अमेरिकन, डेल्टा, साऊथ वेस्ट, युनायटेड आणि फ्रंटियर यांनीही सवलती दिल्या आहेत. लोक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय त्यांचे तिकीट बदलू शकतात.