काम करणाऱ्या महिलांना प्रसूती रजा नाकारून त्यांचे खच्चीकरण करू नका, हायकोर्टाने उपटले महापालिकेचे कान; केईएमच्या कंत्राटी महिला डॉक्टरला लाभ देण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai High court

काम करणाऱ्या महिलांना प्रसूती रजा नाकारून त्यांचे खच्चीकरण करू नका, असे हायकोर्टाने पालिकेला सुनावले. केईएमच्या कंत्राटी महिला डॉक्टरला प्रसूती रजा नाकारल्याने न्या. रियाज छागला व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने पालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रसूती रजा ही काम करणाऱ्या महिलेला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी असते. या महिलेचा हा सन्मान असतो. तेव्हा अशा महिलांबाबत प्रशासनाने संवेदनशील राहायला हवे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या डॉक्टर महिलेला प्रसूती रजेचा लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत.

तडजोड करायला लावू नका 

सध्या बहुतांश महिला कमावत्या आहेत. नवजात बाळाची काळजी घेणाऱ्या अशा महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात येणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण 

ही कंत्राटी डॉक्टर महिला केईएममध्ये कार्यरत आहे. कंत्राटी महिलेला प्रसूती रजा दिली जात नाही, असे सांगत या महिला डॉक्टरला पालिकेने हा लाभ नाकारला. त्याविरोधात या महिला डॉक्टरने याचिका दाखल केली होती.