
इराणच्या कारवाईनंतर बेपत्ता झालेल्या अमेरिकन पायलटच्या चिंताग्रस्त आईला इराणने शनिवारी खास निरोप पाठवला. ‘काळजी करू नकोस! तुझा मुलगा डोनाल्ड ट्रम्पपेक्षा आमच्याकडे जास्त सुरक्षित राहील,’ अशा शब्दांत इराणी दूतावासाने तिला आश्वस्त केले.
इराणने केलेल्या हल्ल्यात शुक्रवारी अमेरिकेची दोन एफ-15 विमाने पडली. त्यातील एक पायलट बेपत्ता आहे. बेपत्ता पायलटच्या आईने मुलाच्या काळजीपोटी ‘एक्स’वर पोस्ट लिहिली. ‘माझ्या मुलाची काळजी वाटते. त्याच्याबद्दल काहीच कळलेले नाही. त्याच्यासाठी प्रार्थना करा’, असे आवाहन तिने केले होते. त्यावर पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेतील इराणी दूतावासांनी प्रतिक्रिया दिली. ‘तुझा मुलगा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत राहण्यापेक्षा इराणच्या कोठडीत सुरक्षित राहील. त्यामुळे अमेरिकी बचाव पथकाने त्याला शोधून काढण्याआधी तो इराणच्या हाती लागावा यासाठी प्रार्थना कर. मुस्लिम आणि सुसंस्कृत इराणी म्हणून युद्धकैद्यांना आदराची वागणूक कशी द्यायची याची आम्हाला जाणीव आहे,’ असे इराणी दूतावासाने ‘एक्स’ पोस्टमध्ये नमूद केले.

























































