
तेल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून श्रीमंत बनण्याचे रशियाचे मनसुबे धुळीस मिळवण्यासाठीच हिंदुस्थानवर डबल टॅरिफ म्हणजेच एकूण ५० टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादल्याचे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स यांनी स्पष्ट केले आहे.
एका वृत्तवाहिनीच्या मीट द प्रेस या कार्यक्रमात व्हेन्स बोलत होते. हिंदुस्थान रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेलखरेदी करत आहे. याला अमेरिकेचा तीव्र विरोध आहे. विशेष म्हणजे चीनकडूनही रशियाकडून मोठया प्रमाणावर कच्च्या तेलाची खरेदी होते. असे असताना अमेरिकेने चीनबाबत कोणत्याही प्रकारचा आक्रमक पवित्रा घेतलेला नाही. युक्रेन आणि रशियामधील युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत असून दोन्ही देशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही व्हेन्स यांनी केला. तसेच जर रशियाने नरसंहार थांबवला, युक्रेनमध्ये हल्ले करणे बंद केले तर रशियाला पुन्हा जागतिक अर्थव्यवस्थेत पूर्वत स्थान मिळेल, व्हेन्स यांनी म्हटले आहे.