
उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम नियोजित चार्टप्रमाणे सुरू आहे. दर आठवडय़ाला आढावा घेतला जात आहे. स्काडा प्रणालीचे कामही जूनअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.
उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम सुरू करण्यात आले आहे. पोचमपाड कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. या कंपनीने काम सुरू केले आहे. कालबद्ध चार्टप्रमाणे काम हाती घेण्यात आले आहे. किती वेळेत किती काम संपवायचे याबाबत नियोजन करून कार्यवाही करण्यात येत आहे. दर आठवडय़ाला कामाचा आढावा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पेरेशनचे चेअरमन असीम गुप्ता आणि सीईओ शीतल तेली-उगले यांच्याकडून घेतला जात आहे.
उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामांतर्गत महत्त्वाची तीन कामे हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये जॅकवेल, कॉपर डॅम, कॅनॉल ही कामे करण्यात येत आहेत. कामाचा सर्व्हेही पूर्ण झाला आहे. त्याचबरोबर क्रॉसिंगमधील कामासंदर्भात परवानगी आणि पैसेही भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत कार्यवाहीही हाती घेण्यात आली आहे.
महत्त्वाच्या स्काडा प्रणालीचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. या अंतर्गत कॉल व फ्लो मीटर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध कामे पूर्ण झाली आहेत. केवळ दुहेरी जलवाहिनी आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे काम चालू आहे. तेही नियोजित वेळेत पूर्ण होतील, असेही शीतल तेली-उगले यांनी स्पष्ट केले.




























































