प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. आंबेडकरांचे नाव घेतले नाही, गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; दोन महिला वन कर्मचाऱ्यांची तक्रार

सोमवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी भाषणावेळी भाजपा नेते, पुंभमेळा मंत्री गिरीष महाजन हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्यास विसरले. याबाबत वनरक्षक माधवी जाधव व दर्शना सौपुरे यांनी आक्षेप घेतला. त्यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

येथील पोलीस कवायत मैदानावर सोमवारी प्रजासत्ताक दिनी भाषण करताना महाजन यांनी डॉ. आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी जाहीर आक्षेप नोंदवला. त्यामुळे तेथे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर वन कर्मचारी दर्शना सौपुरे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या दोन्हीही महिला कर्मचाऱयांना सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सरकारवाडा पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. त्यांनी घोषणाबाजी करत गिरीष महाजन यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सरकारवाडा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे.

दिलगिरी व्यक्त करतानाही वादग्रस्त वक्तव्य

महाजन यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. अनावधानाने उल्लेख राहून गेला, त्याचा इतका गदारोळ झाला, याचे वाईट वाटते, असे ते म्हणाले. आंबेडकर जयंतीच्या उत्सवात मी नेहमी पुढाकार घेतो, स्वतः उपस्थित राहतो. जामनेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारला आहे. मी संघाच्या संस्कारात वाढलो आहे. गावात पंगत देतो, सर्व समाजाच्या लोकांसोबत जेवायला बसतो, असे ते म्हणाले. त्यामुळे वादात आणखी भर पडली आहे.

महाजनांच्या बेनामी संपत्तीचा हिशेब मांडणार – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री गिरीश महाजन यांची बेनामी मालमत्ता उघड करण्याचा इशारा दिला आहे. महाजन यांच्याकडे 12 हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला आहे. महाजन यांनी संपत्ती दडवून ठेवली आहे. उत्पन्न लपवून ठेवले आहे. आयकर विभागाला त्यांनी संपत्तीची खरी माहिती द्यायला हवी होती. परंतु त्यांनी आयकर विभागाला 1100 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे सांगितले आहे. खरा आकडा कितीतरी जास्त आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.