
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी
आयुर्वेद संतुलित आहारावर भर देते. त्यामुळे केवळ फलाहार हा पूर्ण पोषण देणारा ठरत नाही. डिटॉक्स किंवा अल्पकाळासाठी फलाहार योग्य ठरतो.
आयुर्वेदानुसार फक्त फलाहार हा डिटॉक्स किंवा अल्पकालीन उपवास म्हणून फायदेशीर आहे. मात्र हा कायमस्वरूपी आहार म्हणून योग्य नाही. आयुर्वेद संतुलित आहारावर भर देतो, ज्यात सर्व चवी उदा – मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय अशा षड्रसांचा आणि योग्य आहाराचा समावेश असतो, जेणेकरून शरीराचे तेज (ओजस्) टिकून राहील. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, संपूर्ण फलाहार करणारी फूड इन्फ्लुएंसर झान्ना साम्सोनोव्हा यांचे 39 व्या वर्षी प्रथिनांच्या तीव्र कमतरतेसह कुपोषण होऊन निधन झाले.
ही परिस्थिती नुसता फलाहार किंवा कच्च्या व्हेगन आहारामुळे येऊ शकते का? तर त्याचे उत्तर होय असे आहे. फलाहार किंवा कच्च्या व्हेगन आहारामध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्व अ आणि जीवनसत्व बी 12 खूपच कमी असतात. त्यामुळे अशक्तपणा (अॅनिमिया), मज्जासंस्थेचे विकार, वंध्यत्व व हृदयविकार यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. आहारात जर चरबींचा अभाव असेल तर चरबीयुक्त जीवनसत्त्वे शरीरात शोषली जात नाहीत. म्हणूनच डायबिटीज, रक्तदाब असे रोग असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने नुसता फलाहार करावा.
फक्त फलाहार करणे हा उपवास (उपवास/लघन उपचार) चा एक प्रकार मानला जातो. म्हणून फलाहार अल्पकालीन 1 ते 3 दिवस अथवा 7 दिवस डिटॉक्स शुद्धीकरणासाठी चांगला आहे. दीर्घकाळासाठी फलाहार टाळावा. कारण यात स्नायू, रक्ताचे पोषण करणारे घटक व रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणारे गुणधर्म कमी असतात.
आयुर्वेदामध्ये आहार साधारणत सात्त्विक, राजसिक व तामसिक अशा तीन प्रकारांत विभागला जातो. त्यात फलाहार हा सात्त्विक मानला जातो, परंतु सात्त्विकता राजस आणि तामस गुणांना भाजून काढते, तसंच काहीसे या सात्त्विक आहारात घडते. ज्याचा परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही आहे. काही विशिष्ट अवस्थांमध्ये विशेषत आमदोष कमी करणे, शरीर हलके करणे यासाठी उपयोगी असते.
प्रकृतीनुसार आपल्याला कुठली फळे योग्य आहेत ती निवडावी. वात प्रकृती असल्यास गोड, रसाळ व शिजवलेली फळे उपयोगी ठरतात. कोरडी, तुरट व थंड फळे टाळावीत. उकडलेले सफरचंद, नासपती, पिकलेले केळे, पपई, भिजवलेली अंजीर, आंबा, गोड द्राक्षे, मनुके, भिजवलेले खजूर इत्यादी खाऊ शकता. पित्त प्रकृतीच्या लोकांना थंड, गोड, रसाळ फळे उपयुक्त आहेत. उदा- खरबूज, टरबूज, गोड द्राक्षे, पिकलेला आंबा, नारळ, नासपती, गोड डाळिंब, गोड संत्रे, गोड बेऱया (जांभळे, मुलबेरी) वगैरे प्रकार आहेत. आंबट व उष्ण फळे टाळावीत.
कफ प्रकृतीच्या लोकांना हलकी, तुरट व किंचित आंबट फळे उपयुक्त असतात. अतिशय गोड, जड, रसाळ फळे टाळावीत. केळी, खरबूज, गोड आंबा, खजूर जास्त प्रमाणात टाळावीत. डाळिंब, तुरट बेऱया (क्रॅनबेरी, स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी), चेरी, जर्दाळू इत्यादीचा आहारात समावेश करावा.
खरोखर नवरात्रसारख्या सणात फळांवर नऊ दिवस उपवास करणार असाल तर फलाहार संपल्यानंतर थेट जड अन्न न घेता हलका आहार घ्यावा. खिचडी, मूगडाळीचे सूप किंवा पालेभाज्यांचा रस यापासून सुरुवात करावी. तुपकट, तळलेले व जड अन्न लगेच घेऊ नये.
आपल्याकडे कस्टर्डमध्ये केलेले फ्रुट्सलेड हा अतिशय लोकप्रिय पदार्थ जेवणात आढळतो. आयुर्वेदात फळ व दूध एकत्र घेणे निषिद्ध (वर्ज्य) मानले आहे. जर असे खायचेच असेल तर चक्का किंवा नारळाच्या दूधात किंवा योगर्टमध्ये फळे खावीत. मूळ भारतीय फळांपैकी पपनस, महाळुंग यांसारखी फळे नवरात्रात खाणे उपयुक्त आहेत.
म्हाळुंग ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अरुची दूर करून तोंडाची रूची वाढवते म्हणून त्याला ‘मातुलुंग’ किंवा ‘रूचक’ असे म्हणतात. महाळुंग भूक वाढवणारे व अनेक आजारांमध्ये गुणकारी आहे. महाळुंगाचे केसर, साल, रस, गर तथा मूळ अशा सर्व भागांचा वेगवेगळ्या आजारांच्या चिकित्सेत उपयोग होतो.
आपल्या आहारात ऋतूनुसार येणारी फळे समाविष्ट करावीत. तसेच आपल्या भागात कुठली फळझाडे फळ देऊ शकतात त्याचा विचार करून ती फळे खावीत, जी पचायला योग्य असतात व आरोग्यदायी असतात.