कर्जत शहरामध्ये लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहणार आहे. या भव्य पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन आज शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या हस्ते झाले. शिवसेनेने दिलेला शब्द पाळला असून दीड ते दोन महिन्यांत या पुतळ्याचे अनावरण होईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. यावेळी शेकडो शिवसैनिकांसह भीमसैनिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहात जयघोष केला.
कर्जत शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सध्या अर्धाकृती पुतळा आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा, अशी मागणी भीमसैनिकांची होती. याबाबत शिवसेनेने केवळ आश्वासनच न देता आज या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन व स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला. उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, एकनाथ पिंगळे, बाबू घारे, पंढरीनाथ राऊत, भीमसेन बडेकर,संपत हडप, प्रथमेश मोरे, शहरप्रमुख नीलेश घरत, माजी नगरसेवक संतोष पाटील, जगदीश दिसले, कृष्णा जाधव, सुजल गायकवाड आदी पदाधिकारी तर उत्तम जाधव, अरविंद मोरे, हरिश्चंद्र यादव, सुनील गायकवाड, गुलाब शिंदे, बी. एच. गायकवाड, मनोहर ढोले, दीपक मोरे, हिरामण गायकवाड, प्रकाश गायकवाड, संदीप जाधव, गौतम ढोले, नरेश गायकवाड, सुनील गायकवाड, धर्मेंद्र मोरे, उमेश गायकवाड यांसह शेकडो बौद्ध बांधव उपस्थित होते. बौद्ध धर्माच्या भंते यांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात सदर कार्यक्रम पार पडला.
संविधानामुळेच सर्वांना समान अधिकार
भूमिपूजन सोहळ्यात नितीन सावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा याकरिता अनेकदा नगरपालिकेत प्रश्न उपस्थित केला. परंतु तीन वर्षे पाठपुरावा करूनही नगर परिषदेने पुढाकार न घेतल्याने मी स्वतः स्वखर्चाने आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्याचे काम हाती घेतले आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच सर्वांना समान अधिकार मिळाले. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा कर्जतमध्ये उभा राहावा, अशी इच्छा मनोमन होती. याबाबत शिवसेनेने दिलेला शब्द पाळला आहे, असेही सावंत यांनी सांगितले. पुतळा व स्मारकाच्या सुशोभीकरणाकरिता 30 ते 35 लाखांहून अधिक खर्च येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.