
>> डॉ. गजानन शेपाळ
नाशिकच्या गोदेच्या परिसराला कुंचल्यातून जिवंत करणारे कलायोगी शिवाजी तुपे. नेहरू सेंटर येथे आयोजित त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन कलासृजनाचा आनंद देते.
नाशिकच्या दक्षिण गोदेच्या परिसराला आपल्या सिद्ध रंगसाधनेने कागदावर जिवंत करणारे निसर्ग चित्रकार शिवाजी तुपे सर हे नाव माहिती नसेल तर तो दृश्य कलाकार दुर्दैवीच म्हणावा लागेल. अशा या महान कलायोगी तुपे सरांची अस्सल निसर्गचित्रे सध्या या वर्षी 17 ते 29 डिसेंबर 2025 च्या कालावधीमध्ये वरळीच्या नेहरू सेंटरच्या वातानुकूलित कला दालनात प्रदर्शित करण्यात आली आहेत. खरे तर हे प्रदर्शन म्हणजे `सिंहावलोकनी प्रदर्शन’ म्हणावे लागेल. गुरू, पा युतीचा योग जसा दुर्मिळ असतो तद्वतच हे प्रदर्शन पाहण्यासाठीचा योग आहे.
नाशिक येथील तुपे सरांच्या शिष्या श्रीमती मुक्ता बालिगा या ज्येष्ठ महिला चित्रकर्ती. त्यांच्या मोलाच्या सहभागासह त्यांचे नाशिकमधील सहकारी, चित्रकार यांच्या सहकार्यातून हे अनोखे प्रदर्शन सुरू आहे. ज्येष्ठ निसर्ग चित्रकार पॉल क्ली यांनी निसर्ग चित्रणासंदर्भात एक विधान केलेले आहे त्याची आठवण तुपे सरांची नेहरू सेंटरमधील निसर्ग चित्रणे पाहताना येते. पॉल क्ली म्हणतात, “जेव्हा तुम्ही स्वतच निसर्गाशी एकरूप होता तेव्हाच तुम्ही निसर्ग चित्रण करू शकता. ड्रॉईंग पेपरवर समोरचा निसर्ग तेव्हाच अवतरतो जेव्हा तुम्ही स्वतच निसर्ग बनता.” फार आशयगर्भ असं हे वाक्य आहे.
मी स्वत शिवाजी तुपे सरांच्या खोलीमध्ये त्यांना भेटलो होतो तेव्हा सकाळची वेळ होती आणि सरांच्या खोलीमध्ये त्यांच्या पेपरवर सूर्य किरणांमध्ये न्हाऊन निघालेला गोदेचा घाट दिसत होता. सर जडदेहाने खोलीत होते आणि सूक्ष्म देहाने गोदेच्या त्या घाटावरील सकाळची कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत होते. निसर्ग जपणारा, निसर्ग जगणारा आणि निसर्ग जोडणारा हा अवलिया म्हणजे नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात येणाऱ्या दीर्घायुषी साधूंपेक्षा वेगळा नव्हता. अशीच अनुभूती त्यांची निसर्ग चित्रे पाहताना येते. त्यांच्या चित्रातील अवकाश, आकार, रंग आणि पोत यातून यथायोग्य भोवताल चित्रित करण्याचं ध्येय निश्चित झालं की, मग चित्रित ठिकाणांचा भूगोल, इतिहास व नागरी जीवन यांचे सौंदर्यात्मक निरीक्षण सुरू व्हायचे. त्याला अनुसरून रेखांकन सोबतीला ऐतिहासिक मूल्य आणि संदर्भाने व्यक्तींचे दैनंदिन जीवन सारे तपशील जणू ठरवल्याप्रमाणे पेपरवर अवतरणार. पाहता पाहता समोरचा कागद बोलायला लागतो. रंगीत, स्वान्तसुखाय चित्रे रंगविणारा आणि रंगात रंगून जाणारा हा अवलिया अक्षरश पेपर्ससोबत रंगसंवाद साधतो. हे सारं याची देही पाहायचं असेल तर `वरळीच्या नेहरू सेंटर’कडे पावलं वळलीच पाहिजेत. सरांच्या निसर्ग चित्रणातील प्रमुख घटक उदाहरणार्थ- त्यातील व्यक्ती, वस्तू, वास्तू व निसर्गातील झाडे, पशू, पक्षी यांचे संदर्भ घेऊन ते कला सृजनाचा मनसोक्त आनंद घेतात.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी नेहरू सेंटर गॅलरीचे विद्यमान संचालक संतोष पेडणेकर यांनी या प्रदर्शनासाठी घेतलेला सािढय पुढाकार, त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. चित्रकार वा कुठल्याही कला प्रकाराचा साधक हा त्यांच्या कला विषयक योगदानामुळे चिरंजीवच असतो. निसर्ग चित्रणातील छत्रपती शिवाजी तुपे सरांच्या कलाकृती सर्व कला रसिकांनी आवर्जून पाहाव्यातअशा आहेत.




























































