राजघाटाऐवजी निघमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार, काँग्रेसचा आक्षेप

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले असून त्यांच्यावर शनिवारी दिल्लीत अंत्यसंस्कार पार पडलीत. दिल्लीच्या निघमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. पण काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर राजाघाटावर अंत्यसंस्कार व्हावे अशी काँग्रेसची मागणी आहे.

केंद्रीय गृहमंत्रलयाने संरक्षण विभागाला आदेश दिले आहेत. सकाळी 11.45 वाजता निघमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील, त्यासाठी योग्य ती तयारी करावी असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

पण काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. लांबा यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, डॉ. सिंह यांच्यावर निघमबोध घाटावर अंत्यसंस्काराचा निर्णय चुकीचा आहे. डॉ. सिंग यांच्यावर होणारे अंत्यसंस्कार आणि त्यांचे होणारे स्मारक तरी कुठल्याही वादाशिवाय व्हायला हवे होते. भारतमातेचे पुत्र सरदार मनमोहन सिंग गेल्यानंतरही त्यांच्याशी कुठला बदला घेतला जातोय असा सवालही लांबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.

दुसरीकडे निघमबोध घाटावर कुठल्याही माजी पंतप्रधानांवर अंत्यसंस्कार झाले का असा सवाल विचारला जात आहे. सिंग यांच्यावर राजघाटावरच अंत्यसंस्कार झाले पाहिजेत अशी मागणी पुढे येत आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शक्ती स्थळ किंवा वीर भूमीवर अंत्यसंस्कार व्हावे अशी मागणी केली आहे.

अंत्यसंस्काराच्या ठिकाणी स्मारक

ज्या ठिकाणी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार होतील तिथेच त्यांचे स्मारक बांधले जावे अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे. खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून तसेच पत्र लिहूनही ही मागणी केली आहे.

वाजपेयी यांच्यावर राजघाटावर अंत्यसंस्कार
भाजप नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले होते. त्यांच्यावर दिल्लीतील राजघाटाजवळील राष्ट्रीय स्मृती स्थळावर अंत्यसंस्कार झाले होते. तसेच राजघाटावर सदैव अटल नावाने त्यांचे स्मारकही बांधण्यात आले आहे.