देखणे न देखणे- तुका आकाशाएवढा…

>> डॉ. मीनाक्षी पाटील

कवी आणि सामान्य माणूस यांच्यात अनुभव घेण्यात, आलेल्या अनुभवाचे प्रदीर्घकाळ चिंतन करण्यात आणि ते मुरलेले चिंतन अभिव्यक्त करण्यात फार मोठा फरक असतो. एखादाच तुकोबासारखा महाकवी ‘तुका आकाशाएवढा’ असं अगदी सहज म्हणून जातो. हाच संवेदनशीलतेचा फरक सर्वसामान्य माणूस आणि प्रतिभावंत कवीमध्ये असतो.

आदिम काळापासून माणसाच्या जिज्ञासू वृत्तीमुळे माणसाने सतत वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा प्रयत्न केलेला दिसतो. माणसाच्या या जिज्ञासू वृत्तीतूनच निर्माण झालेला नावीन्याचा, नवनिर्मितीचा ध्यास हा त्याला इतर प्राण्यांहून वेगळेपणा बहाल करतो. आरंभापासूनच निसर्गाधीन होऊन जगण्यापेक्षा निसर्गाला आपल्या अधीन करण्यासाठी मनुष्यजात सतत धडपडत आली आहे. हे करताना सभोवतालातील सर्व गोष्टींचा वापर करीत, प्रसंगी त्यात बदल करीत आपल्या कल्पनाशक्तीचा अंश मिसळत काहीतरी नवीन घडवणं म्हणजेच ‘निर्मिती’ करणं हा मानवी स्वभावाचा महत्त्वाचा विशेष राहिला आहे. माणसांच्या या ‘निर्मिती’ वृत्तीविशेषामध्ये भाषेचे फार महत्त्वाचे योगदान असते.

भाषा ही समूहाची निर्मिती असून ती विविध चिन्हांनी बनलेली असते. माणसे रंग, स्वर, शब्द अशा विविध चिन्हांचा वापर करून जगणं अधिक सुंदर करण्यासाठी धडपडताना दिसतात. निसर्गातल्या इतर जड वस्तूंप्रमाणे मानवी शरीर हे जरी जड, सतत बदलणारे असले तरी या निसर्गाला, संपूर्ण भवतालाला जाणणारी एक चेतनाशक्ती माणसात असल्यामुळे तो त्याआधारे त्या भवतालाला एक अर्थ देत असतो. माणसाला लाभलेल्या बुद्धी या शक्तीच्या आधारे माणसाने समोर दिसणाऱया दृश्यमान सृष्टीच्या पलीकडे असलेल्या दृष्टीआडच्या सृष्टीचाही सातत्याने वेध घेण्याचा प्रयत्न सुरुवातीपासूनच केलेला आहे. या अर्थाने पाहिल्यास कवी, तत्त्वज्ञ किंवा शास्त्रज्ञ ही सारी मंडळी आपापल्यापरीने जगण्याचे, विश्वाचे रहस्य उलगडण्याचाच सतत प्रयत्न करीत असतात असे म्हणता येईल. आपण मागच्या लेखात पाहिले की, सर्वसामान्य माणसाची भवतालाकडे पाहायची दृष्टी ही उपयुक्ततेच्या विचाराने नियत झालेली असते, तर कलावंताची दृष्टी ही उपयुक्ततेच्या दृष्टीच्याही पलीकडे अधिक व्यापक असं काही शोधत असते. दोहोंमधला हा फरक प्रामुख्याने संवेदनशीलतेच्या स्तरावरचा असतो.

मूलत हजारो वर्षांच्या मानवी इतिहासात भवतालाचे, विविध मानवी भावभावनांचे वैविध्यपूर्ण अनुभव माणसाच्या अंतर्मनात साठत आले आहेत . हे सारे अनुभव भाषा, विविध सांस्कृतिक परंपरा, विविध कला अशा प्रतीकसृष्टीच्या माध्यमातून पिढय़ापिढय़ांतून व्यक्ती आणि समाजाच्या भावविश्वात संक्रमित होत आले आहेत. अशा या माणसांच्या व समाजमनाच्या भावविश्वात रुजलेल्या अनुभवाच्या संस्काररूपाला प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग याने ‘आदिबंधरूप प्रतिमा’ असे म्हटले आहे. त्याच्या मते मानवी मनोव्यापार हे जाणीव, व्यक्तिगत नेणिव आणि सामूहिक नेणिव अशा तीन स्तरांवर चाललेले असतात. या तीन स्तरांपैकी सामूहिक नेणिवेत मानवजातीच्या हजारो पिढय़ांचे असंख्य अनुभवांचे अवशेष साठलेले असतात.

विविध संस्कृतींमध्ये हजारो वर्षांपासून आदिमाता, आदिपिता, नायक, खलनायक, देव, दैत्य, स्वर्ग, नरक अशा वैविध्यपूर्ण आदिबंधरूप प्रतिमा समाजमानसात खूप खोलवर नेणिवेत रुजलेल्या असून त्या त्या संस्कृतील विविध कला, साहित्य, पुराणकथा, धर्मविधी अशा विविध माध्यमांतून त्या वेगवेगळ्या प्रकारे सातत्याने प्रकट होताना दिसतात. या आदिबंध प्रतिमांमधून एखाद्या कलाकृतीत सामूहिक नेणिवेतील आदिम भाववृत्ती मूर्त करण्याचे जसे सामर्थ्य असते अगदी तशाच भाववृत्ती रसिकाच्या मनातही जागे करण्याचे सामर्थ्य असते.

विविध कलांमधून या प्रकारच्या विविध आदिबंध प्रतिमा कलात्मक पद्धतीने अभिव्यक्त होत असतात. अर्थात कोणत्याही कलाकृतीचे विश्लेषण करताना प्रत्येक वेळीच आदिबंधरूपाच्या दृष्टिकोनातून विचार करणे हे चुकीचे ठरू शकते. कारण कलाकृतीचे विश्लेषण करण्याच्या अनेक मार्गांपैकी तो एक मार्ग असतो हे लक्षात ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते. एखाद्या कवितेतील काव्यात्मकता समजून घेताना आशय आणि अभिव्यक्तीतून व्यक्त होणाऱया अनेक शक्यतांचा विचार करावा लागतो. एखादा प्रतिभावंत कवी आपल्या कवितेत सभोवतालच्या जगण्यातूनच आशयद्रव्य घेत असतो, काही वेळा तो परंपरेने चालत आलेल्या आदिबंध प्रतिमा, मिथकांचा वापर करताना दिसतो. परंतु हे तो पठडीबाज सांकेतिक पद्धतीने करीत नाही तर त्या पारंपरिक संकेतांची तो तोडमोड करतो, त्या पारंपरिक संकेतांचं उल्लंघन करून एक नवीन काव्यात्म सौंदर्यसर्जन करतो. अर्थात हे सारं काही तो जाणिवपूर्वक करीत नाही तर तो त्याचा अगदी सहजस्फूर्त असा प्रातिभ आविष्कार असतो.

जसे सभोवतालचे आकाश आपण सारेच पाहत असतो. रोजच आपल्याला त्या आकाशात सूर्य, चंद्र, तारे दिसत असतात, परंतु एखादाच तुकोबासारखा महाकवी ‘तुका आकाशाएवढा’ असं अगदी सहज म्हणून जातो. हाच संवेदनशीलतेचा फरक सर्वसामान्य माणूस आणि प्रतिभावंत कवीमध्ये असतो. थोडक्यात असे म्हणता येईल की, कवी आणि सामान्य माणूस यांच्यात अनुभव घेण्यात, आलेल्या अनुभवाचे प्रदीर्घकाळ चिंतन करण्यात आणि ते मुरलेले चिंतन अभिव्यक्त करण्यात फार मोठा फरक असतो. या चिंतनशीलतेतूनच सभोवतालातील विविध घटकांमधील, विविध अनुभवांमधील एक परस्परसंबंध, एक अनुबंध कवीला जाणवत असतो.

कवी हा त्याच्या तीव्र संवेदनशीलतेमुळे सांकेतिकतेच्या पलीकडे जाऊन विविध अनुभवांमधील परस्पर संबंध अधिक सूक्ष्मस्तरावर जाणू शकतो. त्यामागील अर्थ, रंग, गंध, नाद, स्पर्श आणि स्वाद या संवेदनांमधील सूक्ष्मातिसूक्ष्म छटा त्याला अधिक तीव्रतेने जाणवतात आणि तितक्याच ताकदीने तो त्यांना शब्दांतून व्यक्त करतो. हे करताना कवी भवतालातील जडाला आपल्या प्रातिभशक्तीने चैतन्य बहाल करत असतो.
(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या
सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)

[email protected]