देखणे न देखणे – जे न देखे रवी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. मीनाक्षी पाटील

कोणताही कवी किंवा लेखक हा लेखनासाठी जरी वास्तवातीलच आशयद्रव्य घेत असला तरी आपल्या प्रातिभा सामर्थ्याने तो त्या वास्तवाच्या आधारावरच एका कल्पित अशा विश्वाची निर्मिती करीत असतो. त्याची ही कृती एकाच वेळी आत्मशोधाची जशी असते तशीच ती जीवनशोधाची देखील असते.

मानव समूहाच्या इतिहासात नीट डोकावून पाहिले तर मानवजात उपांत होत असताना जीवनसंघर्षासाठी जशी आपली ऊर्जा खर्च करताना दिसते, तशीच अगदी जोमाने जीवनाचा उत्सवही साजरा करताना दिसते, किंबहुना या ऊर्जेतूनच मानवी संस्कृतीची उभारणी झाली असावी असे मानले जाते. आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहता असे दिसून येते की, विविध कलानिर्मितींच्या मुळाशी माणसांची ही ाढाrडा प्रवृत्तीच मुख्यत कारणीभूत ठरली आहे. मानवी संस्कृतीच्या विकसनात भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, किंबहुना भाषेशिवाय कोणतीही संस्कृती आकारालाच येऊ शकत नाही. आरंभापासूनच माणसे आपल्या जीवनजाणिवा कधी स्वरांनी, शब्दांनी, रंगांनी, तर कधी शारीरिक हालचालींनी, हावभावांनी व्यक्त करीत आली आहेत. आदिम काळापासून मनुष्यजात अशा विविध चिन्हांच्या भाषेचा वापर करत विविध प्रकारे व्यक्त होत आली आहे. अशा विविध चिन्हभाषांतूनच हळूहळू पुढे नृत्य, संगीत, चित्र, शिल्प, साहित्य अशा विविध कलांची निर्मिती झालेली दिसते.

भवतालातील निसर्ग व त्याच्या वैविध्यपूर्ण विभ्रमांच्या निरीक्षणातून जगण्यातल्या एका नैसर्गिक लयीचे ज्ञान माणसांना होत गेले. सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र असे दिवस -रात्रीचे पा असो की उन्हाळा-पावसाळा-हिवाळा हे ऋतुपा, अशा विविध रचनाबंधांतून माणसाला गवसलेली ाढाrडामूलक लय ही सर्व कलांचे उगमस्थान आहे असे मानले जाते. आरंभापासूनच निसर्गातल्या या लयीशी माणसाचं एक आंतरिक नातं असून काळाच्या ओघात हे नातं विविध कलांच्या माध्यमांतून वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत आलं आहे. माणसाकडे प्रामुख्याने शरीर व सूर ही आविष्काराची साधने अंगभूतच असल्यामुळे नाचणे व गाणे हे अगदी सुरुवातीपासूनच प्राथमिक कलाविष्कार ठरले आहेत. आपल्या प्रदीर्घ उपांतीच्या प्रवासात बाह्य जगाकडून येणाऱया विविध संवेदनांना प्रतिसाद देताना मनुष्यप्राणी स्वर, शब्द, रंग अशा विविध प्रतीकांची मदत घेत घेत जड भवतालाला चैतन्य बहाल करीत आला आहे. याच प्रकारच्या प्रतिसादातून माणसाने स्वततील चैतन्याचे आरोपण जड जगावर करून त्याला अधिक मानवी करण्याचे काम सातत्याने केले आहे. येथेच सर्वसामान्य माणूस आणि कलावंत यांच्यातील वेगळेपण अधिक स्पष्ट होत जाते. खरे तर `भाव’ हे मूलत स्वगत असतात म्हणजे एखाद्या व्यक्तिमनाला येणारा तो विवक्षित अनुभव असतो, पण कलावंत त्याला जाणवणारा एखादा `भाव’ विविध रूपांत आविष्कृत करीत असताना जणू स्वतलाच विविध रूपांत विभागत असतो. व्यक्तिगत अनुभूती विविध प्रतीके, प्रतिमांच्या माध्यमातून आविष्कृत करीत असतो. या अर्थाने विविध कला या आत्माविष्काराच्या स्वरूपाच्या असल्या तरी प्रत्यक्ष निर्मितीप्रािढयेत मात्र त्या अवैयक्तिक बनतात, वस्तुनिष्ठ बनतात.

सर्वसामान्य माणसे आणि कलावंत हे एकाच समाजवास्तवाचे घटक असले तरी त्या समाजवास्तवाकडे बघण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनात मूलभूत फरक असतो. सामान्य माणसाची संवेदनशीलता ही प्रामुख्याने उपयुक्ततेने नियत झालेली असते, त्याची दृष्टी साध्यसाधनप्रधान असते. त्यामुळे त्याला भवतालातून येणाऱया संवेदनांना, अनुभवांना त्या त्या वेळी पूरक ठरतील असे जीवनोपयोगी अर्थ देऊन तो जगत असतो. याउलट कलावंत वृत्तीच्या व्यक्ती त्या त्या अनुभवांच्या मुळाशी, गाभ्याशी जायचा प्रयत्न करत असतात. या दृष्टीने पाहिल्यास सर्वसामान्य माणूस आणि कलावंत यांच्यात मूलभूत फरक हा संवेदनशीलतेच्या स्तरावरचा असतो हे स्पष्ट होते. कलावंत वृत्तीच्या व्यक्तीची दृष्टी ही केवळ उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून नियत होत नाही, तर ती अधिक व्यापक असते, सामान्य विषयातही फार मोठा आशय पाहू शकते, किंबहुना समोर दृश्यरूपात दिसणाऱया गोष्टींबरोबरच समोर दृश्य नसलेल्या अमूर्त गोष्टीही त्यांना अत्यंत तीव्रतेने जाणवतात. `जे न देखे रवी ते देखे कवी’ यांसारखे शब्दप्रयोगही कवीच्या या प्रातिभ सामर्थ्याला अनुलक्षून केले जातात. सर्वसामान्य माणसे जी भाषा वापरतात ती भाषा कवी काही वेगळ्या प्रयोगांनी नव्याने घडवतो. प्रतिभावंत कवी समाजनिर्मित भाषेतल्याच शब्दांची काही विशिष्ट प्रकारे मोडतोड करून एक नवीनच रचना घडवतो. थोडक्यात दैनंदिन संवादाची, संभाषणाचीच भाषा कवितेत एका वेगळ्याच काव्यभाषेत रूपांतरित होते, आशय-अभिव्यक्तीच्या अनोख्या प्रयोगातून त्या `कवीची’ भाषा बनते.

साहित्यकलेचा विचार केला तर असे दिसून येते की, कोणताही कवी किंवा लेखक हा लेखनासाठी जरी वास्तवातीलच आशयद्रव्य घेत असला तरी आपल्या प्रातिभ सामर्थ्याने तो त्या वास्तवाच्या आधारावरच एका कल्पित अशा विश्वाची निर्मिती करीत असतो. त्याची ही कृती एकाच वेळी आत्मशोधाची जशी असते तशीच ती जीवनशोधाचीदेखील असते. या अर्थाने साहित्यकला किंवा कोणतीही कला दृश्य विश्वातील सामान्य घटक घेऊनच अभिव्यक्त होत असली तरी आपल्या प्रातिभ स्पर्शाने त्या सामान्य घटकांना विशेष भावरूप बहाल करीत असते, भवतालातील जडत्वाला चैतन्य बहाल करून दृश्य-अदृश्याचा सातत्याने वेध घेत असते.

(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या  सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)

[email protected]