संस्कृतायन – भारवीची थोरवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. समिरा गुजर जोशी

भारवी हा कालिदासाइतकाच प्रसिद्ध कवी. ज्याचा उल्लेख ऐहोळे ह्या कर्नाटकातल्या गावातील एका जैन मंदिरात रविकीर्ती या कवीने लिहिलेल्या शिलालेखात दिसून येतो. आपल्याकडून चूक घडली तर त्याचे प्रायश्चित्त घेतलेच पाहिजे अशी धारणा असणारा भारवी, ज्याला लोकांना जिंकून घेणारे कवित्व साध्य होते. किरातार्जुनीयम् हे त्याने रचलेले काव्य यामुळेच लोकप्रिय ठरले.

‘कुमारसंभव’ या महाकाव्याविषयी जाणून घेतल्यानंतर आता महाकवी भारवीचे `किरातार्जुनीयम्’ हे महाकाव्य पाहू, पण त्याआधी भारवी या महाकवीविषयी थोडे जाणून घेऊ.

संस्कृत महाकवींचा काळ निश्चित करणे किंवा त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेणे हे एखाद्या रहस्यकथेइतकेच गूढ असते. मुळात हे कवी स्वतविषयी कोणतीही माहिती देत नाहीत. त्यामुळे सगळे अंदाज बांधावे लागतात. अनेकदा कथानक रामायण, महाभारतावर आधारित असते. त्यामुळे कथेवरून काळाचा अंदाज बांधूया हेही शक्य होत नाही. अशा वेळी इतर कुणीतरी, कुठेतरी लिहिलेलं एखादं वाक्य, एखादा उल्लेख हा महत्त्वाचा दुवा ठरतो. महाकवी भारवीच्या बाबतीत हेच झालेले दिसते.

ऐहोळे ह्या कर्नाटकातल्या एका गावात एका जैन मंदिरात रविकीर्ती या जैन कवीने लिहिलेला एक शिलालेख आहे. त्या शिलालेखात एक वाक्य येते- `स विजयतां रविकीर्ति कविताश्रितकालिदासभारविकीर्ति।’

आता या एका वाक्यावरून किती गोष्टी कळतात बघा. की भारवी हा कालिदासाइतकाच प्रसिद्ध कवी आहे. आता ह्या शिलालेखाचा काळ निश्चित आहे… इसवी सन 634- 35. म्हणजे भारवी या आधी होऊन गेला हे नक्की. कालिदासाच्या जोडीने त्याचे नाव घेतले जात आहे ह्याचा अर्थ तो हा शिलालेख लिहिण्यापूर्वी 100 वर्षे तरी अंदाजे आधीचा असला पाहिजे. त्यात आता दुसरा एक क्यू आपल्या समोर येतो. हा फारच रोचक आहे… अवंतीसुंदरी नावाचे एक काव्य सापडले आहे. जे महाकवी दंडीने लिहिले आहे. आता हे काव्य सापडल्यावर बरीच नवी माहिती हाती येते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला कळते की कवी दंडी हा भारवीचा पणतू आहे. त्याने आपल्या पणजोबांविषयी काही हकिकतीही सांगितल्या आहेत. त्यातून आपल्याला कळते की गुजरातमधील आनंदपूर नावाच्या शहरातील हे कुटुंब काही कारणाने अचलपूर (म्हणजे आजचे मध्य प्रदेशातील एलिचपूर) येथे राहायला आले. तेथील राजा विष्णुवर्धन याच्याशी भारवीची मैत्री झाली. एकदा राजाबरोबर शिकारीदरम्यान नकळत मांस खाल्ले गेल्यामुळे त्याला स्वतचीच लाज वाटू लागली. घरी परतण्याचेही धैर्य त्याला राहिले नाही. मग तो तीर्थयात्रेसाठी बाहेर पडला. तेव्हा काही काळ गंग घराण्यातील दुर्विनीत नावाच्या राजाकडे राहिला.

दक्षिण भारतातील पल्लव राजा सिंहविष्णू याच्याविषयी त्याने लिहिलेली एक आर्या एका गायकाच्या माध्यमातून राजापर्यंत पोहचली आणि राजाने भारवीला बोलावून घेतले. आपल्या दरबारात राजकवी केले. मग भारवी तेथे स्थिरावला. त्याला तीन मुलगे झाले. त्यातील एक मनोरथ, त्याला वीरदत्त नावाचा मुलगा होता, त्याची पत्नी गौरी. या मातापित्याच्या पोटी दंडीचा जन्म झाला.

पहा, ज्याच्याविषयी काहीच ठाऊक नव्हते त्या भारवीचे चित्र हळूहळू आकाराला येऊ लागले आहे. भारवी हा विद्वान तर होताच, पण लोकांना जिंकून घेणारे कवित्व त्याला साध्य होते. त्याचा विवेक सदैव जागा असावा. आपल्याकडून चूक घडली तर त्याचे प्रायश्चित्त घेतलेच पाहिजे ही त्याची धारणा दिसते. त्याच्याविषयी आणखी एक दंतकथाही प्रसिद्ध आहे. त्याचा एक प्रसिद्ध श्लोक आहे जो किरातार्जुनीयम्ध्ये देखील येतो.

सहसा विदधीत न ािढयामविवेक परमापदां पदम्।

वृणते हि विमृश्यकारिणं गुणलुब्धाः स्वयमेव सम्पद।।

कोणतेही कार्य अचानक अविचाराने करू नये. अविवेक हा मोठय़ा संकटांचे कारण ठरू शकतो. योग्य विचार करून कृती करणाऱ्या व्यक्तीकडे मात्र गुणांवर भाळणारी लक्ष्मी स्वतहून कृपा करते.

या श्लोकाविषयीची गोष्ट थोडक्यात अशी की, भारवी विद्वान तर होता, पण गरीबही. एक दिवस बायकोच्या पारीला कंटाळून त्याने हा श्लोक विकण्याचे ठरवले. योगायोगाने तो श्लोक राजाच्या हाती पडला. त्याला आवडलाही. पण त्याने उद्या येऊन बक्षीस घेऊन जा असे म्हटले. राजा जेव्हा आपल्या महालात पोहोचला तेव्हा त्याने दृश्य पाहिले की, राणीजवळ कोणी युवक झोपला आहे. अर्थातच राजाचा संताप झाला. त्याक्षणी आधी त्या युवकाला आणि मग राणीला ठार मारावे म्हणून त्याने तलवारीला हात घातला. इतक्यात त्याला हातात असलेला हा श्लोक दिसला. त्याने संताप आवरला. राणीला झोपेतून उठवले आणि त्याला कळले की, तो त्यांचा हरवलेला मुलगा होता. मग त्या श्लोकाचे मोल त्याला खऱ्या अर्थाने कळले आणि त्याने भारवीला बोलावून त्याचा सन्मान केला.

असा हा `महाकवि भारवी.’ त्याच्या काव्याविषयी पुढील लेखातून जाणून घेऊ.

(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)

[email protected]