संस्कृतायन – अग्निशिखा द्रौपदी

>> डॉ. समिरा गुजर जोशी

किरातार्जुनीयची कथा म्हणजे महाभारतात अर्जुनाने किरात (वनवासी) वेश धारण केलेल्या भगवान शंकरांकडून पाशुपत अस्त्राची प्राप्ती करून घेतली तो कथाभाग. महाभारतातील वनपर्वातील हा तुलनेने छोटा म्हणावा असा प्रसंग, या कथानकाचा विस्तार महाकवी भारवीने 1040 श्लोकांत आणि 18 सर्गांत केला आहे. आज आपण या महाकाव्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या द्रौपदीच्या संवादाचे सर्ग पाहूया.

किरातार्जुनीयची कथा म्हणजे महाभारतात अर्जुनाने किरात (वनवासी) वेश धारण केलेल्या भगवान शंकरांकडून पाशुपत अस्त्राची प्राप्ती करून घेतली तो कथाभाग. महाभारतातील वनपर्वातील हा तुलनेने छोटा म्हणावा असा प्रसंग, पण या कथानकाचा विस्तार महाकवी भारवीने 1040 श्लोकांत आणि 18 सर्गांत केला आहे. आज आपण या महाकाव्याचे प्रवेशद्वार असणाऱया पहिल्या सर्गाकडे एक नजर टाकू. या पहिल्याच सर्गात भेटणाऱया तेजस्वी द्रौपदीच्या दर्शनाने आपण दिपून जातो. कौरवांच्या सभेत अपमानित झालेली ही मानिनी, पण आजवर तिने आपले दुःख कधी इतक्या कठोर शब्दांत आपल्या पाच पतींसमोर व्यक्त केले नसेल. आज मात्र आपले वागणे जरी आततायी वाटले तरी चालेल, पण मला माझे मत निक्षून सांगायचेच आहे हे तिने ठरवलेच आहे. असे काय घडले आहे आज ? चला पाहू या.

पांडव वनवासात असताना त्यांच्या दूताने कौरवांची खबरबात आणली आहे. दूत आपण काय बातमी आणली आहे हे सांगण्याआधी प्रस्तावना करत असतानाच भारवीने त्याच्या तोंडी किती सुंदर वचन दिले आहे पहा. दूत म्हणतो – माझे कामच आहे जे सत्य आहे ते तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडणे. त्यामुळे यानंतर मी जे सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐका, कटू असले तरीही ! (हितं मनोहारि च दुर्लभं वच:।) शब्द हितकारकही आणि ऐकायला गोडही आहेत. हा फार दुर्लभ योग आहे. म्हणजे बहुतेकदा कटू बोलणे आपल्याला त्या क्षणी मनाला लागले तरी हितकारक असते आणि ऐकायला गोड वाटणारे हे तितकेच नुकसान करणारे किंवा फसवे असू शकते. आयुष्यातील किती महत्त्वाचा अनुभव किती कमी शब्दांत या ठिकाणी सांगितला आहे! अर्थात या प्रस्तावनेवरून तो जे आता सांगणार आहे ते ऐकायला कडू असणार आहे याविषयी शंकाच नाही, पण भारवीने या ठिकाणी स्वतच्या स्वतंत्र प्रतिभेचा प्रत्यय दिला आहे. त्याने दुर्योधनासाठी नावच वापरले आहे सुयोधन. या दूताने त्याच्या नगरीत जाऊन बातमी काढून आणली आहे की, तुम्हाला दिवसात अनीतीने फसवल्यानंतर आता मात्र तुम्ही वनवासातून परतल्यावर पराभव कराल या शंकेने भयपीत झालेला सुयोधन आपले राज्य नीतीच्या जोरावर जिंकू इच्छित आहे. म्हणूनच लोकांचे मन जिंकून घेता येईल अशा पद्धतीने तो राज्यकारभार करत आहे. त्याच्या राज्यात सर्व सुखी आहेत. आता हे ऐकल्यावर द्रौपदी चिडली नसती तरच नवल! हे ऐकून चिडलेली द्रुपदत्मजा अजूनही शांत असणाऱया युधिष्ठिराला म्हणते, तुम्हाला हे माझ्यासारख्या स्त्रीने सांगावे असे नाही, पण न राहवून बोलते आहे. तुम्ही स्वतच कमावलेले राज्य एखाद्या मधून मस्त गजराजाने आपल्या सोंडेने आपल्या गळ्यातील हार फेकावा तसे बेदरकारणपणे फेकून दिलेत. जे जशास तसे वागणे हा साधा नियम पाळत नाहीत अशा लोकांचे वागणे मूर्खपणाचे म्हटले पाहिजे. अन्यायी माणसाशी सौजन्याने वागण्यात कसले शौर्य? चिलखत न घालता युद्धात गेलेला योद्धा जसा सगळीकडून रक्तबंबाळ होईल तशीच अवस्था आपल्या स्वाभिमानाचे कवच न घालणाऱया व्यक्तीची होते.

शत्रूने इतका अपमान केल्यानंतर तुम्ही सुकलेल्या शमी वृक्षाप्रमाणे क्षणात ाढाsधित होऊन पेटून उठायला हवं ! माझीच नाही, तेजस्वी भीमाची, मानी अर्जुनाची, गुणी नकुल-सहदेव यांची ही दयनीय अवस्था पाहूनही तुम्ही पेटून का उठत नाही? पूर्वी सोन्याच्या पलंगावर झोपणारे तुम्ही आज तृणशय्येवर झोपता आहात, कंदमूळ खाऊन जगता आहात! मला याचा खेद नाही. जोवर शत्रूला हरवण्याची उमेद वीर पुरुषांमध्ये जिवंत आहे ना, तोवर पराभवोप्युत्सव मानिनीनाम्। जोवर जिंकण्याची जिद्द टिकून आहे तोवर पराभवही उत्सवासारखा आहे. किती उदात्त कल्पना आहे! लाह्या फुटाव्यात तसे द्रौपदीचे शब्द ाढाsधाने या पाच बंधूंच्या कानावर आदळत आहेत. आज तिला थांबवण्याचे धाडस कोणात नाही. युधिष्ठिर तर खाली मान घालून ऐकून घेतो आहे, पण कनिष्ठ बंधूंमध्ये स्वतच्या बायकोला दुजोरा देत मोठय़ा भावाविरुद्ध बोलण्याचे धाडस तरी कोणात आहे का? ते पाहू या पुढील लेखात!
(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि
संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)

[email protected]