
>> डॉ. श्रीमंत कोकाटे
मराठा इतिहास लेखनासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे डॉ. जयसिंगराव पवार यांचे दुःखद निधन हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि इतिहास संशोधन क्षेत्रासाठी धक्कादायक आहे. कारण ते आयुष्याच्या या टप्प्यावर शिवचरित्र लेखन करत होते. त्या चरित्राचा काही भाग लिहिला आहे. त्यांची इतिहास संशोधन क्षेत्रातील प्रदीर्घ तपश्चर्या पाहता एक महत्त्वपूर्ण शिवचरित्र मिळणार होते अशा टप्प्यावर त्यांचे निधन हे फारच वेदनादायी आहे. तडसरसारख्या दुष्काळी गावात त्यांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. सरकारी नोकरीचा त्याग करून शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मराठा इतिहास संशोधनासाठी झोकून दिले. कुलगुरूसारखे पद सहज मिळत असताना त्याची अभिलाषा न बाळगता मराठा इतिहास संशोधन आणि लेखनाचे काम त्यांनी आयुष्यभर केले.
मराठा इतिहासातील अनेक क्लिष्ट विषयांवर त्यांनी भाष्य केले. इतिहास संशोधक म्हणून अनेक वादग्रस्त बाबींवर त्यांनी भूमिका घेतली, पण याप्रसंगी त्यांनी संयमी आणि विवेकी भाषा वापरली. मतभेदापलीकडे त्यांनी मैत्री जपली. कोणाबद्दलही आकस ठेवला नाही. वैचारिक क्षेत्रातील आपले विरोधक आपले दुश्मन नसतात ही त्यांची भूमिका होती. कोणत्याही पुरस्काराची अभिलाषा न बाळगता त्यांनी संशोधन आणि लेखनाचे काम केले.
डॉ. जयसिंगराव पवार मोठय़ा मनाचे अभ्यासक होते. नवीन संदर्भ हाती आल्यानंतर आपल्या जुन्या मताचे खंडन करून इतिहासाची पुनर्मांडणी करण्यासाठी प्रामाणिकपणा, हिंमत आणि जिज्ञासू वृत्ती असावी लागते ती त्यांच्याकडे होती. त्यामुळेच त्यांनी दादोजी काsंडदेव आणि रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते असे ठामपणे संदर्भासह मांडले. गेली चाळीस वर्षे महाराष्ट्रात इयत्ता चौथीला शिकविले जाणारे शिवचरित्र याचे पुनर्लेखन डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. ते भूमिका घेणारे इतिहासकार होते.
महाराष्ट्राच्या जनमानसावर इतिहासाबाबत कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट आणि कविकल्पनांचे मोठे गारुड होते. अशा पार्श्वभूमीवर डॉ. जयसिंगराव पवार यांनी कागदपत्रांच्या आधारे निःपक्षपातीपणे इतिहासाची मांडणी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचे पुनर्लेखन करणारा महाग्रंथ त्यांनी संपादित केला. प्रवाहपतीत न होता त्यांनी इतिहासाची मांडणी केली. कठीण काळात छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्य रक्षणाचे केलेले कार्य यावर त्यांनी महाग्रंथ लिहिला. वा. सी. बेंद्रे, ग. ह. खरे, सेतुमाधव पगडी, डॉ. आप्पासाहेब पवार यांच्याप्रति सतत कृतज्ञता बाळगत त्यांनी इतिहास संशोधनाचे काम पुढे नेले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा सत्य इतिहास पुढे आणण्याचे कार्य डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. सुमारे तीस वर्षांपूर्वी शाहू महाराजांच्या बद्दल अपप्रचार खूप झाला होता. त्याचे खंडन करून त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र गावोगावी पोहोचवले. विशेषतः जगातील महत्त्वाच्या भाषांत त्यांच्या शाहू चरित्राचा अनुवाद झालेला आहे.
डॉ. जयसिंगराव पवार हे प्रागतिक विचारांचे होते. ते पक्षपाती नव्हते. त्यांनी कोणत्याही इझमसाठी काम केले नाही. इझमसाठी लिहिलेला इतिहास हा सार्वकालिक नसतो असे ते नेहमी म्हणत. महाराणी ताराराणीचे चरित्र गावोगावी जाऊन प्रत्येक घरातील मुलगी निर्भीड आणि कणखर झाली पाहिजे असे ते म्हणत असत. त्यांचे प्रदीर्घ मार्गदर्शन नव्या पिढीला लाभले. त्यांना आपल्या विद्वतेचा, अफाट कार्याचा यत्किंचितही अहंकार नव्हता. अतिव कर्तृत्वातून येणारा हटवाद त्यांच्याकडे नव्हता. डावा-उजवा असा भेदभाव त्यांनी कधी केला नाही. त्यामुळे त्यांनी सर्व गटातील लोकांना मोठय़ा मनाने मार्गदर्शन केले. मी सरांना म्हणालो होतो की, सर तुमचा शंभरावा वाढदिवस साजरा करायचा आहे. तेव्हा सर म्हणाले, शिवचरित्र लिहिण्यापुरते आयुष्य मिळावे एवढीच इच्छा आहे. डॉ. पवार सर इतिहासासाठी लढले आणि इतिहास लेखनासाठी जगले.
(लेखक इतिहास अभ्यासक आहेत.)





























































