
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि नौदलाने स्वदेशी बनावटीच्या एअर ड्रॉपेबल कंटेनर एडीसी-150 च्या चाचण्या यशस्वी केल्या. या चाचण्या गोव्याच्या किनाऱ्यावरून पी8आय विमानातून करण्यात आल्या. नौदलासाठी हे कंटेनर खूपच महत्त्वाचे आहे. त्यामुळे नौदलाची ऑपरेशनल लॉजिस्टीक क्षमता आणखी मजबूत होईल. 21 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 दरम्यान वेगवेगळ्या अत्यंत परिस्थितीत या इन-फ्लाइट रिलीज चाचण्या घेण्यात आल्या.
एडीसी 150 काय आहे?
एडीसी 150 ही एक स्वदेशी एअर ड्रॉप सिस्टिम आहे. त्याच्या मदतीने विमानातून समुद्रातील जहाजांना 150 किलोपर्यंतचे आवश्यक सामान पोहोचवणे शक्य होईल. एडीसी 150 च्या माध्यमातून समुद्रात तैनात असलेल्या उपकरणे, औषधे, आवश्यक स्पेअरपार्टस् आणि आपत्कालीन सामान वेगाने पोहोचवले जाईल.
सामानाने भरलेले कंटेनर विमानातून खाली सोडल्यानंतर पॅराशूटच्या मदतीने हळूहळू समुद्रात उतरवले जाते. त्यामुळे आतील सामान सुरक्षित राहते.
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, हिंदुस्थानी नौदलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, पी- 8 आय विमानांसाठी एडीसी-150 प्रणाली कमी कालावधीत विकसित आणि पात्र करण्यात आली आहे. सर्व विकासात्मक उड्डाण चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत.



























































