डॉक्टर…लस घेतल्यावर दारू पिता येईल की कायमची सोडावी लागेल ?

डॉक्टरसाहेब… लस घ्यायच्या आधी किंवा लस घेतल्यानंतर दारू पिता येईल का हो… की लस घेतल्यानंतर कायमची दारू सोडावी लागेल… अशा प्रश्नांचा भडिमार लसीकरण केंद्रावरील डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर होत आहे.लसीकरणानंतर दारू प्यायला मिळणार नाही या चिंतेपोटी तळीराम लसीकरणापासून चार हात लांब राहत असल्याने ग्रामीण भागातील लसीकरणाचे प्रमाण दहा टक्क्यांच्या वरही सरकत नसल्याचे उघड झाले आहे.याबाबतची गाईडलाईन नसल्याने डॉक्टरही निरूत्तर होत असल्याने लसीकरणात नवाच ट्विस्ट निर्माण झाला आहे.

मिशन वॅक्सिनेशनची मोहिम केंद्र आणि राज्य सरकारने जोरात सुरू केली आहे.जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी महापालिका,नगरपालिका आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच रूग्णालये व आरोग्य केंद्रे ॲक्टिव्ह झाली आहेत.मात्र शहापूर तालुक्यातील गावापाड्यातील लसीकरण केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसमोर एका प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही. ते म्हणजे डॉक्टर… लसीकरणाआधी किंवा लसीकरणानंतर दारू पिता येणार नाही का? लसीकरणाच्या नियमावलीत लसीकरण करण्यासाठी मद्यप्राशनाबाबत कोणतीही गाईडलाईन नसल्याने या तळीरामांना उत्तर काय द्यायचे,असा प्रश्न त्यांना पडला आहे.

45 व त्यापुढील नागरिकांना सध्या लस उपलब्ध आहे. ग्रामीण भागात तळीरामांची संख्या मोठी आहे.लस घेतली तर दारू पिता येणार नाही,या चर्चेमुळे धास्तीने ग्रामीण भागातील बहुतांश तळीराम कोविडची लस घेण्यापासून दोन हात दूर राहत असल्याची धक्कादायक आकडेवारी आता उघडकीस येऊ लागली आहे.शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासी पाड्यात बहुतांश लोक मजुरीची कामे करीत असल्याने त्यांना रोज दारू प्यायल्याशिवाय चैन पडत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील पाड्यांतून 10 टक्केही लसीकरण झाले नसल्याचे समोर आले आहे.

याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून माहिती घेतली असता लसीकरणानंतर मद्यप्राशन करू नये किंवा करावे याबाबत कुठल्या प्रकारची गाईडलाईन आरोग्य अथवा शासनाकडून आलेली नाही.त्यामुळे यावर भाष्य करणे त्यांनी टाळले.मात्र असे असले तरी मद्यप्राशन करणे शरीरास हानिकारक आहे.त्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही.त्यामुळे ‘समझनेवाले को इशारा काफी है!’ अशी प्रतिक्रिया जगन्नाथ स्मृती रूग्णालयाचे डॉ.किशोर जाधव यांनी दिली

शहापूर तालुक्यात 8 प्राथमिक केंद्रावर लसीकरण सुरू असून 26 एप्रिलपर्यंत 13 हजार 821 जणांचे लसीकरण झाले असून त्यात पुरूष -7819 व महिला-6002 आहेत.परंतु गावापाड्यातील अनेक पुरूषांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याची माहिती लसीकरण अधिकाऱ्यांनी दिली.

.

आपली प्रतिक्रिया द्या