
नेपाळहून उत्तर प्रदेशमार्गे रायगड जिल्ह्यात चरसचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यात मुरुड पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणात नेपाळहून जिल्ह्यात चरस आणणाऱ्या मुख्य आरोपीसह एकूण 13 जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी विशाल जैसवाल याला पोलिसांनी नेपाळ येथून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी 13 लाख 61 हजार रुपयांचे 2 किलो 659 ग्रॅम चरस जप्त केले असल्याची माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.
29 जून रोजी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास मुरुड मोहल्ला येथील अलवान दफेदार हा दुचाकीने येत होता. शिघ्र चेकपोस्ट येथे पोलीस चेकिंग करीत असल्याने दुचाकीच्या पाठी बसलेला मुरुड गावदेवी येथील राजू खोपटकर हा खाली उतरून पळून गेला. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी दुचाकी तपासली असता डिकीमध्ये 776 ग्रॅम चरस अमली पदार्थ पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी दफेदार याला ताब्यात घेत तपास केला. तपासात उत्तर प्रदेश येथील विशाल जैसवाल हा नेपाळहून उत्तर प्रदेश येथे चरस आणत होता व तेथून तो हे चरस मुरुड तालुक्यात घेऊन येत होता. यानंतर तो आपल्या साथीदारांच्या सहाय्याने मुरुड, अलिबाग परिसरात चरस विकत असल्याची माहिती मिळाली.
वाहने चोरून विकली
13 आरोपींपैकी एक जण चोरीच्या गाड्या विक्री करीत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे या आरोपीच्या चौकशीतून चोरी झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, अविनाश पाटील, जनार्दन गदमले, हरी मेंगाळ, किशोर बठारे, अतुल बारवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.































































