विजयादशमी उत्साहात साजरी झाल्यानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे दिवाळीचे. दिवाळीत घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी गोडधोड पदार्थ बनवण्याची तयारी आता पुढच्या आठवड्यात सुरू होईल, परंतु हे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या सुकामेव्याच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सुकामेव्यामध्ये प्रामुख्याने काजू, बदाम, जर्दाळू, अक्रोड, मनुका यांचा समावेश असतो, परंतु या सर्वांच्या किमती आता महाग झाल्या आहेत. काजूचा प्रति किलो भाव आता एक हजार ते पंधराशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे. काजूचा मागील वर्षी भाव 550 ते 800 रुपये प्रति किलो होता. सुकामेव्याचे दर वाढल्याने लाडूमध्ये हमखास टाकला जाणारा काजू आणि बदाम गायब होण्याची भीती वर्तवली जात आहे. दिवाळीत ड्रायफ्रूट्सच्या किमती महागल्याने यंदाच्या दिवाळीतील बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
दरवाढ कशामुळे
दिवाळीत ड्रायफ्रूट्सला चांगली मागणी असते, परंतु या वर्षी ड्रायफ्रूट्सचे दर वाढण्यास इराण-युक्रेन युद्धाचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. आफ्रिका, ब्राझील या देशातून काजू, अंजीर, अक्रोड, पिस्ता, बदाम, खजूर, बेदाणा येतो, परंतु यंदा जास्तीच्या पावसामुळे तेथील उत्पादन कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे ही दरवाढ झाल्याचे काही व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
ड्रायफ्रूट 2023 2024
बदाम 600 ते 900 900 ते 1000
काजू 550 ते 800 900 ते 1500
अक्रोड 600 ते 800 700 ते 800
अंजीर 700 ते 1200 1000 ते 1500
जर्दाळू 300 ते 500 400 ते 1000
खजूर 200 ते 8000 300 ते 1200