
आखातात भडकलेल्या युद्धामुळे जागतिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात ब्रेक लागला आहे. याचा सर्वाधिक मोठा फटका दुबईच्या पर्यटन क्षेत्राला बसला आहे. दुबईचे पर्यटन तब्बल 80 टक्क्यांनी घटल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता पर्यटकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी दुबईच्या पर्यटन विभागाकडून नवनव्या योजना आखल्या जात आहेत.
दुबई सरकारने अनेक प्रमुख पर्यटन स्थळांचे प्रवेश शुल्क माफ करत तिथे मोफत प्रवेश सुरू केला आहे. तर काही पर्यटनस्थळांच्या प्रवेश शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. दुबईतील काही सरकारी संग्रहालये आणि सांस्कृतिक केंद्रांमध्ये पर्यटकांना आता विनामूल्य प्रवेश दिला जात आहे. ‘बुर्ज खलिफा’ (Burj Khalifa), ‘दुबई मॉल एक्वेरियम’ आणि प्रमुख ‘थीम पार्क्स’मध्ये तिकिटांच्या दरात 50 टक्क्यापर्यंत मोठी सवलत देण्यात आली आहे. अनेक नामांकित हॉटेल्सनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘स्टेकेशन’ (Staycation) ऑफर्स आणि जेवणावर विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.
इराण युद्धामुळे एकीकडे महागाई आणि इंधन टंचाईचा भडका उडाला असताना विमान वाहतूक आणि त्यासोबतच पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. विमान कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे दर अवाच्या सवा वाढवले आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत परदेशवारीचे नियोजन करणाऱया कुटुंबांची कोंडी झाली आहे. युद्धाचे सावट आणि वाढलेले तिकीट दर अशा दुहेरी कात्रीत पर्यटनाची परदेशवारी अडकली आहे.
दुबई विमानतळाबाहेर इराणचा ड्रोन हल्ला
दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात रविवारी रात्री इराणने ड्रोन हल्ला केला. हे ड्रोन एका इंधनाच्या टँकरवरच कोसळले त्यामुळे तिथे मोठी आग लागली. त्यामुळे दुबई विमानतळ प्रशासनाने सर्व विमान उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. याचा प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.


























































