
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मध्यपूर्वेतील युद्धाच्या 16 व्या दिवशी इराणने संयुक्त अरब अमिरातीवर 1,800 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले चढवले आहेत. दुबईतील मरिना आणि अल सुफूह भागात मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. युएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे आवाज इराणकडून येणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट करताना झाले आहेत. हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले यशस्वीरीत्या रोखले असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इराणच्या ड्रोन हल्ल्यांमुळे फुजैराह येथील तेल साठवणूक केंद्राला भीषण आग लागली. आगीचे् लोट आणि काळ्या धुराचे साम्राज्य परिसरात पसरले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या टर्मिनलवरील सर्व वाहतूक थांबवण्यात आली आहे. या घटनेत एका जॉर्डनच्या नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. फुजैराह हे आखाती देशातील एक महत्त्वाचे तेल केंद्र असल्याने जागतिक तेल पुरवठ्यावर याचे परिणाम होण्याची शक्यता आहे.
युद्धाची तीव्रता वाढत असताना कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरही अनेक ड्रोन हल्ले इराणकडून करण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव एप्रिलमध्ये होणाऱ्या बहरीन आणि सौदी अरेबियामधील ‘फॉर्म्युला1’ (F1) शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत. संपूर्ण आखाती क्षेत्रात सध्या हाय-अलर्ट घोषित करण्यात आले आहे.
युद्धाच्या वाढत्या संकटामुळे सौदी अरेबिया, युएई, कुवेत, ओमान, कतार आणि बहरीन या सात देशांमधील CBSE बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या संघर्षात आतापर्यंत 5 हिंदुस्थानींचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. हिंदुस्थानी दूतावास सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवत असून अडकलेल्या हिंदुस्थानींना मदत पुरवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
धडाम.. बूम.. मुळे व्रूमSs व्रूमSss बंद! आखातातील युद्धामुळे F1 रेस रद्द



























































