‘वैनगंगा-नळगंगा’ला वाशीम, मेहकरही जोडणार; शिवसेनेच्या दणक्यानंतर मिंधे सरकार ताळय़ावर

विदर्भ-मराठवाडय़ाचे जलसंकट दूर करण्याची क्षमता असलेल्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. परंतु, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ अशा पाच जिह्यात तसेच पूर्व विदर्भातील वर्धा जिल्हा हे शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत. असे असताना वाशीम जिह्याला प्रकल्पातून वगळण्यात आले. याची गंभीर दखल घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने धरणे आंदोलन केले. त्यामुळे मिंधे सरकार ताळ्यावर आले आणि वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला वाशीम आणि मेहकरही जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

कारंजा व मानोरा तालुका शिवसेनेच्या वतीने उपविभागीय कार्यालय कारंजा येथे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शेतकरी नेते डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या सरकारने जसे या प्रकल्पातून महत्वाचे जिल्हे वगळले तसेच या सरकारला येणाया विधानसभा निवडणुकीसह प्रत्येक निवडणुकीतून हद्दपार करू असा निर्वाणीचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला. आंदोलनात शिवसेनेचे तालुका प्रमुख विलास सुरळकर, कारंजा विधआनसभा संपर्क प्रमुख गोपाळ येवतकर, समन्वयक गणेश ठाकरे यांचाही सहभाग होता.  शिवसेनेच्या दणक्यानंतर अखेर मिंधे सरकारने वाशीम आणि मेहकरही वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला जोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शिवसैनिक, सर्व लोकप्रतिनिधी, वैनगंगा-नळगंगा वाशीम जिल्हा संघर्ष समिती आणि इतरांनी वाशीम जिह्याचा या प्रकल्पात समावेश व्हावा म्हणून पुढाकार घेतला, तसेच मिंधे सरकारला जेरीस आणून वाशीम जिह्याचा समावेश करून घेतला त्याबद्दल डॉ. सुभाष राठोड यांनी सर्वांचे जाहीर आभार मानले आहेत.

महिलांवरील अत्याचाराविरोधात मोर्चा

देशभरात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात कारंजा आणि मनोरा तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वांनी तोंडावर काळी पट्टी बांधून सरकारच्या नाकर्तेपणाचा तीव्र निषेध केला. तसेच लेकीबाळींवर अत्याचार होत असताना आंधळे, बहिरे बनलेले मिंधे-भाजप सरकार हटावच्या घोषणाही दिल्या.