जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी-नाले वाहू लागले असून, कन्नड तालुक्यातील दोन जण तर फुलंब्री तालुक्यातील एक जण वाहून गेला आहे. पैकी २ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळला असून, इतर दोघांचा शोध सुरू आहे.
कन्नड तालुक्यतील दोन जण वाहून गेले असून, माळवाडा येथील येथील संतोष विश्वनाथ बोरात (32) रात्री 9 वाजता ब्राम्हणी नदीच्या पुरात वाहून गेले आहेत, त्यांचा शोध सुरू आहे.
नाचनवेल घाटशेंद्रा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पाण्यात दोन वर्षीय चिमुकला बाहून गेला. त्याचा शोध घेतल्यानंतर त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. साई कडुबा बोरसे (2) असे नाव आहे. घाट सेंद्रा गावामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली शेतीला धरणाचे स्वरूप आले. गावालगत एक नाला असून, त्याला पाणी आले. बाजुलाच कडुबा बोरसे याच्या घरासमोरील बसरीमध्ये त्यांचा दोन वर्षांचा साई हा चिमुकला खेळत असतांनाच अचानक नाल्याला पाणी आले पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्या पाण्यात साई हा बाहुन गेला. मुलगा दिसत नाही म्हणून आजुबाजुच्या लोकांसह शोधाशोध सुरू झाली. घरापासून शंभर मिटरच्या अंतरावर असलेल्या लिंबाच्या झाडाच्या मुळ्यांमध्ये साई अडकलेला अवस्थेत आढळला. त्यास तात्काळ चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र साईंची प्राणज्योत मालवली होती. पोळ्याच्या दिवशीच अशी घटना घडल्याने गावात शोककळा पसरली आहे.
गिरजा नदीच्या पुरात एक जण वाहून गेला
तालुक्यातील शेवता येथे दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील गिरजा नदी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे या पुराच्या पाण्यात शेतातून घरी जाणारा व्यक्ती वाहून गेल्याची घटना सोमवारी चार वाजता घडली. शेवता येथे शेतातून घरी जात असणारे राबसाहेब नाना बेडके (45) पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहून गेले, अद्याप पर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला असता ते आढळले नाही. शेवता हे गाव गिरजा नदीच्या काठी आहे सदरील गाव नदीच्या दोन भागात विभागले गावाची लोकसंख्या 2000 असून 1000 नागरिक नदीच्या पलीकडे राहतात व 1000 नागरिक नदीच्या अलीकडे राहतात गेल्या कित्येक वर्षांपासून याबाबत या ठिकाणी पुलाची मागणी येथील रहिवासी नागरिक शेतकरी करीत आहे पण अद्याप पर्यंत प्रशासनाने दखल घेतलेली नाही सोमवारी दोन वाजता शेवता येथील साईनाथ बेडके यांनी फेसबुक ऑनलाईन येऊन नदीतील पाणी व पुला संदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर चार वाजता सदरील घटना घडली. नदी वाहत असल्यामुळे जि.प. शाळेतील 44 विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत.
वैजापूर तालुक्यात सर्वदूर पाऊस वैजापूर
तालुक्यातील ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी मागील 24 तासांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने वातावरण चिंय झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने रविवारी शहरासह तालुक्यात सर्वत्र हजेरी लावली. सोमवारीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती.
सप्टेंबर रोजी वैजापूर तालुक्यातील वैजापूर, खंडाळा, शिऊर, बोरसर, लोणी, गारज, लासूरगाव, महालगाव, नागमठाण, लाडगाव, पायगाव, जानेफळ, बावतारा या मंडळात सरासरी 137.9 मिमी पावसाची नोंद झाली.
सोयगाव तालुक्यात नदीनाले तुडूंब सोयगाव :
सोयगाव तालुक्यातील नदी, नाले तुडूंब झाले असून, वेताळवाडी जवळील रुद्रेश्वर नाल्याच्या पुराच्या पाण्यात ओमनी कार वाहून गेली. गाडी मालक बचावले, सर्वदूर जोरदार पाऊस बरसल्याने नदी, नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. सोमवारी सकाळी गलवाडा येथील तुळशीराम घुगरे हे ओमनी कार चालवत रूद्रेश्वर नाला पार करीत असताना अचानक पुराच्या पाण्याचा जोर वाढला. ते गाडी सोडून कसेबसे काठावर आले. संततधार पावसामुळे फर्दापूर शिवारात ताराबाई रामधन महाकाळ यांच्या गट क्रमांक 9 मध्ये वाघूर नदीच्या पुराच्या पाण्यात 4 एकर कापसाचे पीक वाहून गेले. संततधार पावसामुळे सोयगाव शहरात घरांची पडझड झाली. हभप रवींद्र महाराज परेराव, कौशल्या मधुकर गव्हांडे, दत्तू कुंभार, धनराज गलिंदे व इतरांच्या घरांच्या भिंत पडून नुकसान झाले. नुकसाभरपाई देण्याची मागणी नगर पंचायतकडे करण्यात आली आहे.
घाटनांद्रा:
परिसरात सोमबार रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटनांद्रा पाचोरा रस्त्यावरील असलेल्या घाटातील दरड कोसळली, मात्र यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. फक्त काही काळासाठी वाहतूक बंद झाली होती.
घाटात दरड कोसळल्याची माहिती, सोयगाव बांधकाम वनविभागाला देण्यात आल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर पडलेले दगडा माती हटवले व घाटातील वाहतूक सुरळीत केल्याचीमाहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता टाकसाळे व सोनवणे यांनी दिली. वाहनधारकानी वाहने चालवताना सावधगिरीने चालवावे असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
रहिमाबाद:
परिसरात जोरदार झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पोळा सण आनंदात साजरा केला. रविवारी रात्री जोरदार झालेल्या पाऊसाने खेळणा मध्यम प्रकल्प हा पूर्णपणे भरला असून रहिमाबाद ते अन्बी मार्गावरील असलेल्या खेळणा नदीचे पाणी पुलाला लागून वरतून वाहताना पहावयास मिळाले त्याच प्रमाणे रहिमाबाद येथील लघु सिंचन प्रकल्प हा 80 टक्के भरला आहे.
वाघूर नदीला 15 वर्षांनंतर पूर
फर्दापूर :
परिसरात रविवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने दाणादाण उडाली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने वाघूर नदीने रौद्ररूप धारण केले होते. पाण्याच्चा विसर्ग वाढतच राहिल्याने नदी शेजारील असलेल्या शेतात पाण्याने शिरकाव केल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
गेल्या 15 वर्षानंतर वाघूर नदीला एवडा प्रचंड पूर आल्याने पूर बघण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. यादरम्यान, छोटे मोठे नदी, नाले ओसांडून वाहू लागल्याने शेतात जाण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र, अतिवृष्टीने परिसरातील कपाशी, मका, सोयाबीन पिक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे.
अजिंठा लेणीच्या माध्यावर वसलेल्या लेणापूर गावात पुराचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांची पंचाईत झाली. येथील आण्णा वराडे, समाधान बावस्कर, अरुण महाकाळ, काकडे, बलांडे गव्हांडे, शेख, पठाण यासह शेकडो शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली.
सिल्लोड तालुक्यातील आठही मंडळात अतिवृष्टी
रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सिल्लोड तालुक्यातील आठही मंडळात अतिवृष्टी झाली. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील खेळणा व पूर्णा नद्या दुथडी वाहू लागले आहेत. या पावसामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे पडली. तर काही ठिकाणी घराचे नुकसान झाले आहे. याबाबत महसूल प्रशासन नुकसानीची पाहणी करीत आहे. दरम्यान सिल्लोड शहरासह तालुक्यातील 15 पेक्षा जास्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या खेळणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने ओसंडून वाहत आहे.
मागील काही दिवसांपासून कमी जास्त प्रमाणात होणारा पाऊस सोमवारी दुपारपासून सिल्लोड तालुक्यात मुसळधार कोसळला. या पावसामुळे तालुक्यातील लघु प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी आले असून तालुक्यातील केळगाव प्रकल्प 100 टक्के भरला आहे. उंडणगाव प्रकल्प 100 टक्के, अंधारी अजिंठा प्रकल्प 50 टक्के रहिमाबाद प्रकल्प 52 टक्के, तर खेळणा मध्यम प्रकल्प 100 टक्के भरल्याने प्रकल्पाच्या सांडव्यावरून खेळणा नदीने पाणी वाहत आहे. तालुक्यातील खुल्लोड येथे गावातील झाड विजेच्या खांब पडलेला आहे जीवित हानी झालेली नाही. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील खेळणा नदीला मोठा पूर आल्याने नदीलगतच्या अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक वाहून गेले. यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आमसरी परिसरात काल रात्री पासुन सुरु असलेल्या वारा व मुसळधार पावसामुळे सुमनवाई श्रीरंगगवळी यांच्या राहत्या घराची भिंत खचली. कोणतीही जिवितहानी झाली नाही.