
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका कोणत्या ना कोणत्या कारणाने लांबल्याचे दिसत आहे. यामुळे अहिल्यानगर जिह्यात मुदत संपणाऱया ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. नववर्षात जिह्यात मुदत संपणाऱया 769 व मागील दोन वर्षांपासून प्रशासक असणाऱ्या आणि निवडणुकीची प्रतीक्षा असणाऱ्या 99 अशा 868 ग्रामपंचायतींच्या निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिह्यातील 2024-25 वर्षातील रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आधी लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडल्या. सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकामार्फत कारभार सुरू आहे. आता त्यात नवीन वर्षात फेब्रुवारी 2026 मध्ये जिल्हाभरातील 769 ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपणार आहे. तेथे निर्धारित वेळेत नवे सदस्य निवडून येण्यासाठी डिसेंबर महिन्यातच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या नगरपालिका निवडणुकीची आणि त्यानंतर महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
या सर्व निवडणुका 31 जानेवारीअखेर संपविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. निवडणूक आयोगासाठी हा कालावधी अपुरा आहे. अशा स्थितीत ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱया बहुतांश ग्रामपंचायती दिग्गज नेत्यांच्या गावातील आहेत. त्यामुळे येथेही राजकीय संघर्ष अटीतटीचा असतो. सरपंच निवडही थेट मतदारांतून होणार असल्याने भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य याकडे रंगीत तालीम म्हणून पाहतात.
सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी
दोनच महिन्यांत मुदत संपणाऱया ग्रामपंचायतींत इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विशेषतः थेट सरपंचपदावर अनेकांनी लक्ष केंद्रित करून कामाला सुरुवात केली आहे. काहींनी जिल्हा व तालुक्यातील नेत्यांशी जवळीक वाढवली आहे, तर काही विद्यमान सरपंचांनी विकासकामांचे नारळ फोडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आतापासूनच सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
दसरा-दिवाळीपर्यंत ‘वेट ऍण्ड वॉच’
फेब्रुवारीतील निवडणुका लांबल्यास त्या आगामी किमान सहा ते आठ महिने घेता येणार नाहीत. मार्चपासून शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षांचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे निवडणुकीसाठी शाळांतील वर्गखोल्या आणि शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. जूनपासून पावसाळा सुरू होतो. त्यामुळे निवडणुका पावसाळा संपल्यावर म्हणजे दसरा-दिवाळीतच घ्याव्या लागणार आहेत.
99 ग्रामपंचायती दोन वर्षांपासून रखडल्या
जानेवारी ते डिसेंबर 2024मध्ये मुदत संपलेल्या 84 ग्रामपंचायतींचा प्रभागरचना व मतदार याद्यांचा कार्यक्रम पूर्ण झाला होता. तसेच जानेवारी ते डिसेंबर 2025 मधील मुदत संपलेल्या 14 ग्रामपंचायतींचाही प्रभागरचना कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामुळे या 99 ग्रामपंचायतींच्या निवडणुका अगोदर होतील. शिवाय काही ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुका होणार आहेत. यानंतरच 2026 मधील 768 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

























































