
हनुमा विहारी आणि तिलक वर्माच्या 79 धावांच्या भागीमुळे सुस्थितीत असलेल्या दक्षिण विभागाचा डाव शम्स मुलानी आणि अरझन नागवासवालाच्या मार्यापुढे कोसळला. त्यामुळे दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाने अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा 7 बाद 182 अशी मजल मारली होती.
पश्चिम विभागाच्या प्रियांक पांचालने नाणेफेकीचा कौल जिंकून दक्षिण विभागाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. प्रियांकचा हा निर्णय पश्चिम विभागाच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. चिंतन गजाने रवीकुमारला यष्टिमागे झेल देण्यास भाग पाडले. मयांक अगरवालही फार मोठी खेळी करू शकला नाही आणि अतित शेठच्या मार्यापुढे तो बाद झाला. सलामीची जोडी 42 धावांत तंबूत परतल्यावर हनुमा विहारी आणि तिलक वर्माने दक्षिण विभागाला सावरले. दोघांनी संघाच्या डावाला शतकही ओलांडून दिले. पण तिसऱया विकेटसाठी 79 धावांची भर घातल्यानंतर अरझान नागवासवालाने ही जोडी फोडली. हाच दक्षिण विभागासाठी फार मोठा धक्का ठरला.
यानंतर दक्षिण विभागाचा डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. 2 बाद 121 अशा चांगल्या स्थितीत असलेल्या दक्षिण विभागाची 7 बाद 182 अशी बिकट अवस्था झाली. विहारीची 130 चेंडूंतील 63 धावांची संयमी खेळी शम्स मुलानीने संपुष्टात आणत दिवसभरातील सर्वात मोठे यश संपादले. मधल्या फळीतील चारपैकी एकाही फलंदाजाला दोनअंकी धावसंख्याही उभारता आली नाही. 65 षटकानंतर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय पंचानी घेतला. खेळ थांबला तेव्हा वॉशिंग्टन सुंदर 9 तर विजयकुमार वैशाक 5 धावांवर खेळत होते.

























































