
गुढीपाडवा ते चैत्र वद्य चतुर्थी असा तब्बल १८ दिवस चाललेला आंजर्ले येथील दुर्गादेवीचा वार्षिक यात्रोउत्सव उत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दापोली तालुक्यातील आंजर्ले गावाचे स्थान महात्म्य तसे खुपच मोठे आहे. अशा अजरालय अर्थातच आंजर्ले गावात जसे कड्यावरील श्री गणपती देवस्थान हे सुप्रसिद्ध देवस्थान आहे. तसे येथील दुर्गादेवीच्या रथोत्सव यात्रेची प्रचिती ही सर्वदूर पसरली आहे. त्यातच स्वच्छ सुंदर विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यामुळे तसेच कासव महोत्सवामुळे त्याचप्रमाणे नितांत सुंदर अशा रमणीय परिसरामुळे आंजर्ले गावाचे नाव हे देशाच्या नकाशावर ठळकपणे झळकत आहे. त्यामुळे राज्यासह अगदी देशाच्या कानाकोपऱ्यासह जगभरातील पर्यटकांची आंजर्ले येथे पर्यटनासाठी येण्याची संख्या ही सतत वाढत चालली आहे. हे आंजर्ले वासीयांच्या एकुणच संस्कृती तसेच राहणीमानाचा आणि या परिसराचे खरे यश आहे. अशा या आंजर्ले गावातील श्री. दुर्गा देवी चे मंदीर हे गावातील प्रमुख देवालयांपैकी एक देवालय आहे. अशा या श्री. दुर्गा देवीच्या मंदिराची स्थापना १६ व्या शतकात झाली असल्याचे सांगितले जाते. मंदिरातील गंडकी शिळेची अष्टभुजा महिषासुरमर्दिनी स्वरुपातील सुंदर मूर्ती ही थोरले बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १६५३ ( इ. स. ५ जुलै १७३१) रोजी स्थापना केली असल्याचे दाखले आहेत.
अशा या आंजर्ले येथील श्री दुर्गा देवी मंदिरात दुर्गादेवी रथयात्रा हा आंजर्ले गावाचा प्रमुख उत्सव मानला जातो. या उत्सवाची सुरूवात ही चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते हा उत्सव ( गुढीपाडवा ते चैत्र वद्य चतुर्थी) असा तब्बल 18 दिवस उत्सव चालतो. चैत्र वद्य प्रतिपदा ते तृतीया हे यात्रा उत्सवाचे प्रमुख तीन दिवस असतात. प्रतिपदेला देवीला मुखवास चढविणे तर गावची यात्रा द्वितीया महाप्रसाद व कालभैरव यात्रा तृतीया रथयात्रा सर्व ग्रामस्थ व भाविक हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या उत्सवाची सुरूवात साधारणतः पाचशे वर्षांपूर्वी झाली असून त्यातील संपूर्ण गावाचा सहभाग कामाची विभागणी आणि उत्साह अनुभवण्यासारखे असते. अशा या आंजर्ले येथील श्री.दुर्गा देवीचा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी सुध्दा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये चैत्र वद्य प्रतिपदा शुक्रवारी ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वा. मुखवास चढविण्यात आला. रात्री १०.३० वा. कीर्तन (गावची यात्रा) ह.भ.प. ओंकार गद्रे (डोंबिवली) यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम, चैत्र वद्य व्दितिया शनिवारी ४ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वा. सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. डॉ. श्रीपाद बिवलकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, कालभैरव यात्रा महोत्सव , शनिवार रात्रौ उजाडता रविवार पहाटे ३.०० वा. कीर्तन – ह.भ.प. प्रथमेश निजसुरे (आंजर्ले) पहाटे ४.०० वा.कीर्तन – ह.भ.प. ओंकार गद्रे (डोंबिवली) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. चैत्र वद्य तृतीया रविवारी ५ एप्रिल रोजी रथोत्सव , सोमवारी ६ एप्रिल रोजी पहाटे ४.०० वा. कीर्तन (लळीत) – ह.भ.प. ओंकार गद्रे (डोंबिवली) यांच्या कीर्तनाने धार्मिक कार्यक्रमाची सांगता होणार आहे. अशा प्रकारे आतापर्यंत भरगच्च कार्यक्रम मोठ्या आनंदाच्या तसेच मोठ्या संख्येच्या भाविक भक्त गणांच्या उपस्थिती पार पडले. तर गुरुवारी ९ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडे दहा वाजता नागेश जोशी लिखित संगीत देवमाणूस या नाटयपुष्पाचे सादरीकरण करणाने एकुणच कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

























































