
>> दुष्यंत पाटील
पाश्चात्त्य चित्रकार जूसेप्पे आर्किम्बोल्डोनं 1566 मध्ये ग्रीक तत्त्वज्ञांच्या चार मूलतत्त्वांवर आधारित चार चित्रांची एक चित्रमालिकाच केली. या मालिकेतील, आगीतून परिवर्तनाची, रूपांतरणाची शक्ती दर्शवणारं ‘फायर’ हे चित्र कल्पकता आणि सर्जनाचं वेगळं उदहारण ठरतं.
हे जग कशापासून बनलंय हा प्रश्न आधुनिक वैज्ञानिकांसारखाच प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञांनाही पडायचा. अर्थातच त्या काळात आजच्यासारखी अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणं नव्हती. ते लोक निव्वळ तर्क वापरून या प्रश्नाचं उत्तर शोधायचे. या विषयावर प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञांनी इ. पू. 5 व्या शतकात एक थिअरी मांडली होती आणि हीच थिअरी पुढची शतकानुशतकं सत्य मानली गेली. या थिअरीप्रमाणे विश्वातली प्रत्येक वस्तू चार मूलभूत तत्त्वांनी बनलेली होती. ही चार तत्त्वं होती – पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू. आपल्याकडे असणाऱया पंचमहाभूतांच्या कल्पनेसारखीच ही थिअरी होती. प्रत्येक वस्तूमधलं चार मूलतत्त्वांचं मिश्रण मात्र वेगवेगळं असणार, असं त्यांना वाटायचं. मिश्रणातलं प्रमाण बदललं की, वेगवेगळ्या वस्तू बनत असणार, असा त्यांचा अंदाज होता. त्यांच्या थिअरीप्रमाणे दगड, माती, वादळ यांसारख्या सगळ्या गोष्टी, इतकंच काय आपलं शरीरही याच तत्त्वांनी बनलेलं होतं. त्यामुळे पाश्चात्त्यांनी वैद्यकशास्त्रातही ही तत्त्वं आणली. त्यांच्या मते शरीरातलं एखाद्या तत्त्वाचं प्रमाण बिघडलं की, आपल्याला आजार व्हायचा. ज्योतिषी मंडळींनी राशींचा संबंधही या चार तत्त्वांशी जोडला होता. काही तत्त्वज्ञांनी तर या चार तत्त्वांचा संबंध माणसांच्या व्यक्तिमत्वांशीही जोडला होता! एकूणच पाश्चात्त्यांवर चार मूलतत्त्वांच्या थिअरीचा शतकानुशतके प्रचंड प्रभाव होता.
या चार मूलतत्त्वांनी भुरळ घातलेल्या पाश्चात्त्य कलावंतांपैकी एक म्हणजे जूसेप्पे आर्किम्बोल्डो. आर्किम्बोल्डोनं 1566 मध्ये चार चित्रांची एक चित्रमालिकाच केली. ही चार चित्रं चार मूलतत्त्वांवर आधारित होती. 1562 मध्ये त्यानं चार ऋतूंवर चार चित्रांची मालिका बनवली होती. 1566 मध्ये पूर्ण केलेली चार मूलतत्त्वांची चित्रमालिका आजही लोकप्रिय आहे. या मालिकेतलं ‘फायर’ हे चित्र सर्वाधिक गाजलं.
‘फायर’ हे चित्र लांबून पाहिलं तर आपल्याला एका माणसाचा चेहरा दिसतो, पण जवळ गेल्यावर लक्षात येतं की, हा चेहरा हाडामांसाचा बनलेला नसून अग्नीशी संबंधित वस्तूंनी बनलेला आहे. या चेहऱयामधला गाल एका मोठ्या ‘गारगोटी’ने बनलाय. त्या काळात आग पेटवण्यासाठी लागणारी ठिणगी गारगोटीचा वापर करून मिळवली जायची. त्याचे नाक आणि कान हे लोहारकामाशी संबंधित लोखंडी अवजारांनी बनलेले आहेत. चेहऱयामधला डोळा म्हणजे एक विझत आलेली ‘मेणबत्ती’ आहे. या मेणबत्तीची वात जवळ जवळ विझलीये. या मेणबत्तीच्या वातीमुळे आपल्याला डोळ्यातल्या बाहुलीसारखा भास होतो. चेहऱयाची हनुवटी म्हणजे तेल ओतायचं ‘दिव्याचं पात्र’ किंवा ‘ऑईल लॅम्प’ आहे. त्याचं कपाळ म्हणजे गुंडाळलेली वात आहे.
चित्रामधला सर्वात लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे चित्रातल्या व्यक्तीचे केस. आर्किम्बोल्डोने जळणारी लाकडं आणि त्यातून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळांना केसांचं रूप दिलंय. जशी शेकोटी पेटल्यावर वरच्या बाजूला ज्वाळा वर जातात, तशीच रचना चित्रकारानं इथे केलीय. त्याच्या मिशा म्हणजे बारीक काड्या आहेत.
चित्रातल्या व्यक्तीच्या गळ्यात एक सोन्याचा दागिना आहे. हे त्या काळातल्या राजांच्या सत्तेचं प्रतीक होतं. शरीराचा खालचा भाग म्हणजे जुन्या काळच्या तोफा आणि बंदुका आहेत. या तोफा आणि बंदुका आपल्याला आठवण करून देतात की, आग ही फक्त स्वयंपाकासाठीच नाही, तर युद्धातील विनाशासाठीही वापरली जाते. आर्किम्बोल्डोनं संपूर्ण चित्रात काळी पार्श्वभूमी दाखवलीय. यामुळे आगीचा तांबूस-पिवळा रंग उठून दिसतो.
आर्किम्बोल्डो एका राजाच्या दरबारात काम करायचा. या राज्याचं एक विशिष्ट चिन्ह होतं. या चिन्हात गरुडांची जोडी होती. आर्किम्बोल्डोनं चित्रातल्या व्यक्तीच्या गळ्याखाली हे चिन्ह दाखवलंय. त्यामुळे तो चित्रामधून अग्नी तत्त्वाचा त्याच्या आश्रयदात्या राजाशी संबंध जोडतोय. ही गोष्ट लक्षात घेतली की, आपल्या चित्रातल्या प्रतीकांचा अर्थ लक्षात येतो.
या चित्रात आपल्याला बंदुका आणि दारूगोळा दिसतो. 1566 च्या काळात बंदुका आणि दारूगोळा हे नवीन आणि अतिशय विनाशकारी असं तंत्रज्ञान होतं. हे प्रतीक त्या राजाच्या साम्राज्याची लष्करी ताकद दाखवतं. चित्रातल्या माणसाच्या गळा आणि मान या ठिकाणी आपल्याला जळती मेणबत्ती दिसते. ख्रिश्चन धर्मात मेणबत्तीच्या ज्योतीला मानवी आत्म्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे ही मेणबत्ती राज्यामधली धार्मिकता दाखवते. केसांच्या जागी जळणारी लाकडं आणि लाल कोळसा दाखवला आहे. आग ही अशी गोष्ट आहे जी पदार्थाचं रूप बदलते. ती धातूला वितळवते, मातीचे मडके बनवते आणि पिठाची भाकरी करते. त्यामुळे या आगीतून त्यानं परिवर्तनाची, रूपांतर करण्याची शक्ती दाखवलीय. या प्रतीकांवरून लक्षात येतं की, हे चित्र केवळ कलेसाठी नव्हतं, तर राजाची महानता सांगणारं एक पोस्टर होतं.
कुठल्याही वस्तूची रचना उद्ध्वस्त करणाऱया अग्नीशी संबंधित गोष्टींची इतक्या कल्पकतेनं रचना करणारा चित्रकार इतिहासात सापडणं कठीणच!
























































