हॉब्ज, हटन अन् कूक

12

द्वारकानाथ संझगिरी

ऑलिस्टर कूक हा काही डोळय़ांचे निरांजन करून पाहावे असा फलंदाज नाही. ‘चल, ऑलिस्टर कूक खेळतोय बघ’ असं मला कुणी सांगितलं असतं तर मी उठून टीव्हीसुद्धा लावला नसता. इथे ओव्हलवर कॉमेंट्री करणाऱया डेव्हिड गोवरला कुणी तारुण्य दिलं असतं, त्याला मैदानावर उतरवलं असतं तर मी पैसे टाकून ओव्हलला धावेन. इथे 1990 साली त्याने हिंदुस्थानसमोर ठोकलेलं शतक अजून माझ्या डोळय़ांसमोर आहे. त्याची फलंदाजी ही मुलायम फटक्यांची व्याख्या होती. कूकच्या फटक्यांचा भार वाहताना ओव्हलच्या गवताच्या, त्या गोवरच्या आठवणी जाग्या झाल्या असतील.

पण तरीही कूकचं ‘शतक’ हे थंड डोकं, कसोटी खेळी कशी उभारायची, बचावात्मक तंत्र आणि जिद्दीने आपला शेवटचा स्टेज परफॉर्मन्स कसा द्यायचा याचं मूर्तिमंत उदाहरण होतं. पहिल्या डावात त्याचं अपेक्षित शतक हुकलं, पण तेव्हाही त्याने शतक जवळजवळ शिजवलं होतं. शतकाची रेसिपी बरोबर होती. फक्त ते शिजवणं थोडं कच्चं राहिलं एवढंच. दुसऱया डावात त्याने घाई केली नाही. इंग्लंडला हिंदुस्थानवर दबाव टाकायला धावा हव्या होत्या. गाठीशी वेळ होता. त्यामुळे जाता जाता कसोटी खेळी कशी असावी याचं प्रात्यक्षिक स्वतःच्या साथीदारांना आणि हिंदुस्थानी संघातल्या फलंदाजांना दाखवायची संधी त्याने सोडली नाही. तो डावखुरा असला, उंच असला तरी सौंदर्याचं वाडेकर, दुराणी, गोवर फ्रँकवुलीचं वरदान त्याला नाही. बॅकफूटवरून चेंडू मिडविकेट, स्क्वेअरलेगला खेचणं, स्क्वेअर कट्स मारणं हा त्याच्या डीशचा कॉड झाला होता. स्ट्रेट ड्राइव्ह, हूक, कव्हर ड्राइव्ह हे पोटॅटो चिप्ससारखे होते. फिश ऍण्ड चिप्स ही इंग्लिश सामान्य माणसाची लाडकी डिश आहे. त्याची फलंदाजी हे त्याचं प्रतिनिधित्व होतं. झंझावाती, मखमली, तडफदार वगैरे विशेषणं त्याच्या फलंदाजीसाठी नव्हती. विक्रम त्याच्यावर फिदा होता. त्याने पदार्पणात हिंदुस्थानविरुद्ध शतक केलं. शेवटच्या कसोटीत हिंदुस्थानविरुद्ध शतक ठोकणे हाही गोड योगायोग म्हणायचा! त्याच्या कारकिर्दीच्या एका टप्प्यावर तो सचिनला शतकाच्या विक्रमांना हात घालेल अशी भीती वाटत होती. सचिनचा विक्रम अबाधित राहावा म्हणून माझ्या धाकटय़ा मुलाने ज्यांना मनातल्या मनात लिंबू मारण्याचा प्रयत्न केला त्यात पाँटिंग, लाराबरोबर कूकही होता (हा अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न नाही. कृपया गंमत म्हणून ते घ्यावं). पण त्याने कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. नेतृत्वात यश-अपयश पाहिलं; पण मैदानावरचं किंवा बाहेरचं त्याचं वर्तन पूर्वीच्या ‘जंटलमन्स गेम’ला साजेसं होतं.

सोमवारी जवळपास भरलेलं ओव्हल मैदान ही कूकच्या लोकप्रियतेची पावती होती. तिथल्या प्रत्येकाचं कूकचं शतक पाहण्याचं स्वप्न पुरं झालं. जो रूटनेही अप्रतिम शतक ठोकलं. आधुनिक फलंदाजांमध्ये मला त्याची फलंदाजी पाहायला आवडते. पण हा दिवस कूकचाच होता. खेळपट्टीवर जाऊन एकटा सेट झाल्यावर थेट बेड ऍण्ड ब्रेकफास्टसाठी जागा बुक करणारा फलंदाज आज निवृत्त झाला. सर जॅक हॉब्ज, सर लेन हटन यांना स्वर्गातही हुंदका आवरला नसेल. त्यांच्या शाळेची धुरा वाहणारा दुसरा खेळाडू इंग्लंडमध्ये आता दिसत नाही.

ऑलिस्टरचे शतक अन् हिंदुस्थानचा पाय खोलात

ऑलिस्टर कूकने कारकीर्दीतील अखेरच्या कसोटीत शतक झळकावत शेवट गोड करण्यासाठी पावले उचलली. पहिल्या डावात 71 धावा करणाऱया कूकने दुसऱया डावात 147 धावांची संस्मरणीय खेळी केली. पहिल्या व अखेरच्या कसोटीत शतक झळकावणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला तो पाचवाच फलंदाज. इंग्लंडने दुसऱया डावात 8 बाद 423 धावांवर डाव घोषित केल्यानंतर 464 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानची तीन बाद 58 धावा अशी अवस्था झालीय.

आपली प्रतिक्रिया द्या