लॉर्डस्वर अकरा मुंडय़ा चीत!

164

द्वारकानाथ संझगिरी

हिंदुस्थानी संघाच्या पराभवाला काय (दु)विशेषण द्यायचं हा प्रश्नच आहे. दारुणपासून मानहानिकारकपर्यंतची सर्व विशेषणं एकत्रितपणे या पराभवाचं वर्णन करता येत नाही म्हणून माना टाकून आहेत. परवा आमच्या ‘एबीपी माझा’वर पराभवाची बातमी लिहिताना सवयीप्रमाणे ‘चारीमुंडय़ा चीत’ वगैर लिहिलं गेलं. मी म्हटलं, ‘‘ते अकरा मुंडय़ा चीत म्हणा. हिंदुस्थानी संघातील एकही मुंडी ताठ मानेने उभी राहिली नाही.’’

पराभवाच्या अनेक कारणांत ‘टॉस’ हे एकच कारण जखमेवर फुंकर घालणारं आहे. पण जखम एव्हढी मोठी आणि खोल आहे की, ही फुंकर क्षणैकसुद्धा आराम देऊ शकत नाही. टॉसच्या वेळी वातावरण ढगाळ दिसतंय. पुढच्या चार दिवसांचे हवामान खात्यांचे अंदाज, ढगाळ वातावरण आणि पावसाचे असूनसुद्धा वेगवान गोलंदाज उमेश यादव बाहेर जाऊन कुलदीप येतोच कसा? आणि मग मॅच संपल्यावर निवड चुकली म्हणण्यात काय अर्थ? उमेश यादव ऍण्डरसन नाहीच नाही. स्टुअर्ट ब्रॉडही नाही. पण या वातावरणात कुलदीपपेक्षा उपयुक्त ठरला असता. टी-20, वनडेत कुलदीपसमोर इंग्लिश फलंदाज गारठत होते. लॉर्डस्वर तो इंग्लिश फलंदाजांसमोर गारठला. शिवरामकृष्ण आठवतो? 1984 साली इंग्लंडविरुद्ध पहिल्या  तीन खेळींत त्याने प्रत्येकी 6 अशा 18 विकेट्स काढल्या होत्या. पुढे कारकीर्दीत म्हणजे 9 कसोटींत या 18 विकेट्स वजा जाता फक्त त्याने 8 विकेट्स काढल्या. आता कॉमेंट्री करतो. कुलदीपला लवकर कॉमेंटेटर करायचा विचार आहे का?

पण तरीही कुलदीपऐवजी उमेश यादव असता किंवा श्रीकृष्ण सोडून जगातला कुठलाही यादव असता तरी या लोटांगणात फरक पडला नसता. किंबहुना हिंदुस्थानी संघातले उर्वरित राखीव खेळाडू अधिक रवी शास्त्री(पोट सुटलं म्हणून काय झालं? रणतुंगा आयुष्यभर सुटलेल्या पोटाने खेळला.) अधिक बांगर मिळूनही मॅच वाचली नसती.

धावा कोण करणार? जिंकायला फक्त 20 विकेट्स लागतात ही अंधश्रद्धा आहे. धावाही लागतातच ना? मला मान्य आहे की वातावरण, स्विंग, इंग्लिश गोलंदाजांचा दर्जा खूप वरचा होता. पण इंग्लंडमध्ये गेल्यावर ढगाळ वातावरण, पाऊस याचा बाऊ करून चालत नाही. पडणाऱया बर्फात खेळायचं तर तसे कपडे लागतात, गंजीफ्रॉकात नाही खेळता येत. इंग्लंडच्या वातावरणात खेळताना स्विंग गोलंदाजीविरुद्ध खेळायचं साइडऑन तंत्र, योग्य चेंडू सोडायची कला, चेंडूवर जाण्यापेक्षा चेंडूची वाट पाहण्याचा संयम आणि एखाद्या उत्तम चेंडूवर बीट झाल्यावरही तो चेंडू विसरून नव्याने आव्हान स्वीकारायची जिद्द, टेंपरामेंट ही फलंदाजीची महत्त्वाची वस्त्रं आहेत. ती तुमच्याकडे नसतील तर तुम्ही उघडे पडता.

जेव्हा वेंगसरकर, गावसकर, विश्वनाथ, अझरुद्दीन, सचिन, गांगुली, द्रविड, सेहवाग, अगदी बांगरने इंग्लंडमध्ये धावा केल्या त्यावेळी खेळपट्टय़ा काय हिंदुस्थानातून आयात केल्या होत्या? पावसाला यज्ञ करून, इंद्राला विनंती करून रोखलं होतं? की समोर दर्जेदार गोलंदाज नव्हते? तेव्हा ऍण्डरसन नसेल, तर बॉथम होता. बॉथम नसेल तर आणि कुणी! 1986 साली यापेक्षा भयाण वातावरण लॉर्डस्ला होतं. तीन दिवस आणि एका चेंडूत ही मॅच संपली होती. ती हिंदुस्थानने जिंकली होती. मदनलाल-बिन्नीने नुसत्या स्विंगवर विकेट्स काढल्या होत्या. म्हणजे, वातावरण आणि खेळपट्टी काय असेल विचार करा. मला आठवतंय, सुनील गावसकर तेव्हा दुसऱया दिवसाचा खेळ संपल्यावर मला म्हणाला होता, ‘‘अरे, कसोटीचे दोनच दिवस झाले आहेत आणि माझ्या दोन्ही इनिंग संपल्या आहेत?’’ त्या खेळपट्टीवर वेंगसरकरने शतक ठोकताना तो असा खेळला की, विमानांच्या रनवेवर बॅटिंग करतोय.

आपल्या आजच्या खेळाडूंची तंत्रं टी-20 आणि वनडेमुळे ‘भेसळयुक्त’ झालीयत. बॅट आऊट स्विंगवर अशी झेपावते की, त्या आवेगाने मुलीसुद्धा सलमानकडे झेपावत नाहीत. हिंदुस्थानात एक पाय पुढे टाकून कुणालाही ठोकून काढता येतं. दिवसभर खेळता येतं. मग पुजारा ‘दविड’ होतो इतर सर्व वाघ होतात. फलंदाजी जागतिक दर्जाची मानली जाते. पुन्हा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेत गेलो की हे सर्व दारिद्रय़रेषेखालचे द्रविड, लक्ष्मण, गावसकर वगैरे होतात. एकही फलंदाज लॉर्डस्वर जिद्दीने उभा राहिला असं त्याच्या शारीरिक भाषेवरून वाटलं नाही. इंग्लंडच्या पहिल्या डावात सुरुवातीला किमान वेगवान गोलंदाजांकडे प्रतिशोध घेण्याची रग आहे असं वाटलं. पण वोक्स, बेअरष्ट्रोने हल्ला केल्यावर त्यांनीही खांदे टाकले. कर्णधारही गोंधळला. आक्रमण करून विकेट्स घ्याव्यात की धावा वाचवाव्यात हा पेच कर्णधाराला सोडवता आला नाही. पॅव्हेलियनमध्ये बसलेले ‘चाणक्य’ही काही करू शकलेले नाहीत. ते सुद्धा हिंदुस्थानात ‘चाणक्य’ असतात. कारण तिथे खेळपट्टी आपल्याला हवी तशी तयार करून घेता येते. रोड रोलरखाली ‘पिचल्या’ जाणाऱया डांबराच्या आणि हिंदुस्थानी संघाच्या भावना लॉर्डस्वर सारख्या होत्या.

पण पुढे काय, हा प्रश्न आहेच. लॉर्डप्रमाणे पॅव्हेलियनध्येच विकेट टाकून नंतर खेळपट्टीवर पंचांकडे जाऊन डेथ सर्टिफिकेट घ्यायचं की लढायचं हे त्यांना ठरवावं लागेल. इथून कोसळणं फारच सोप्पं आहे, उठून लढणं कठीण आहे. आपली पाठ सांभाळत विराट कोहलीला शेलारमामा व्हावं लागेल. गडाचे दोर कापावे लागतील. त्याची फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्याच्या कारकीर्दीतली ही आजपर्यंतची सर्वात मोठी कसोटी आहे. एजबॅस्टनवर त्याने गेलेली पत मिळवलीय. आता फलंदाज म्हणून त्याला ती टिकवायची आहे आणि गलितगात्र झालेल्या इतर फलंदाजांमध्ये ऊर्जा भरायची आहे. आपण फार फार तर देव पाण्यात ठेवू शकतो. पण देव हा लढवय्यांच्या मागे राहतो. म्हणून म्हणतात, ‘प्रयत्नांती परमेश्वर’! पाहूया पुढे परमेश्वर दिसतो का?

 

आपली प्रतिक्रिया द्या