‘कमवा आणि शिका’ योजनेत गैरव्यवहार; गुन्हा दाखल करणार

सामना ऑनलाईन, मुंबई

पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ‘कमवा आणि शिका’ योजनेत झालेल्या अनियमिततेच्या विरोधात एफ.आय.आर. दाखल करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण, राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज आज विधानसभेत दिले. या विद्यापीठातील शैक्षणिक विभागांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ ही  योजना राबविली जाते. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत आर्थिक सहाय्य आणि स्वावलंबनाचे श्रमसंस्कार केले जातात. या योजनेत सहभागी विद्यार्थ्यांना श्रमाच्या मोबदल्यात देण्यात येणारे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा होते. या योजनेत आर्थिक अनियमितता झाल्याने दोषींवर कुठली कारवाई करणार, तसेच ही योजना यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी असणाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा तारांकित प्रश्न विजय काळे, भीमराव तापकीर यांनी उपस्थित केला होता.

संत गाडगेबाबा विद्यापीठ पेपरफुटीची सीआयडी चौकशी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील पेपरफुटी प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येईल. त्याचा अहवाल दोन महिन्यांत पटलावर ठेवण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले. विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.