
हिंगोली जिल्ह्यात आज मंगळवारी सकाळी पाच वाजून 55 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे भूकंपाचे केंद्र आहे. पांगरा शिंदे पासून जवळपास दहा किलोमीटर पर्यंत भूकंपाचा हादरा जाणवला आहे. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत कळमनुरी या भागातील अनेक गावांमध्ये मागील काही वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवण्याची मालिका अधून मधून सुरू असते. तसेच भूगर्भातून आवाज येण्याच्या नेहमीच घटनाही घडत असतात.
दरम्यान, आज मंगळवारी सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला असून याची 3.5 रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. तालुक्यातील पांगरा शिंदे हे गाव भूकंपाचे केंद्रबिंदू असून या परिसरापासून जवळपास दहा किलो मीटर अंतरावर भूकंपाचा धक्का जाणवला. विशेष म्हणजे मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्हाभरात पुन्हा एकदा गारठा जाणवत जाणवत आहे.
भूकंपाचा धक्का जाणवला त्यावेळेस पांगरा शिंदे गावासह आजूबाजूचे नागरिक गुलाबी थंडीच्या साखर झोपेत होते. जमीनीतून हादरा जाणवत घरांच्या खिडक्यासह टीनपत्रे, सामानांचा आवाज झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय भूंकपमापक केंद्रामध्ये 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांनी दिली.
10 किलोमीटर अंतरापर्यंत हादरा
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे भूकंपाचे केंद्र आहे. या गावापासून जवळपास 10 किलो मीटर अंतरापर्यंतच्या वापटी, कुपटी, नांदापूर, बोल्डावाडी, रामेश्वरतांडा, दांडेगाव, कोपरवाडी, बोथी, सालापूर, डिग्रस बु., पिंपळदरी, राजदरी, सिंदगी, सोनवाडी आदी गावांना भूकंपाचा धक्का जाणवला आहे.



























































