
सुधागड तालुक्यातील महागाव परिसर पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. मध्यरात्री मोठा आवाज होऊन जमिनीला कंप झाल्याने येथील गावकऱ्यांची अक्षरशः झोप उडाली असून ते भीतीच्या छायेत आहेत.
सुधागड तालुक्यातील महागाव भोप्याची वाडी, देऊळवाडी, चंदर गाव आणि कोंडप या गावांना सलग हादरे बसले. मध्यरात्री साडेतीन वाजल्यापासून सकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे हादरे बसत होते. त्यामुळे गावकरी मध्यरात्रीच घराबाहेर धावत सुटले. सकाळी साडेपाचनंतर हे धक्के थांबल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या आधीही आमच्या गावांना धक्के बसले. त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित खात्यांकडे पत्रव्यवहार करून या प्रश्नावर लक्ष वेधले. त्यावेळी हे भूगर्भातील धक्के असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. आता पुन्हा एकदा असेच धक्के बसले आहेत, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थ भास्कर पार्टे यांनी केली.
सरकारी अधिकारी घटनास्थळी
या घटनेनंतर सुधागड तहसील कार्याल याकडून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने महागाव पंचक्रोशीत पाहणीसाठी रवाना करण्यात आल्याची माहिती तहसील दार उत्तमकुमार यांनी दिली. भूगर्भ तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.