तरच निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कायम राहिल, खासदार शशी थरूर यांचे मत

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र पोलिसांनी, त्यांना थोड्याच अंतरावर जाण्याची परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. या मोर्चात काँग्रेस खासदार
शशी थरूरसुद्धा सहभागी झाले होते. त्यांनी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

शशी थरूर म्हणाले की, “जोपर्यंत लोकांच्या मनात निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबत शंका राहील, तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेला धक्का बसत राहील. एकदा या शंका दूर झाल्या की, आयोगाची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता पुन्हा परत येईल.” निवडणूक आयोगाला सल्ला देताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणाले की, या प्रश्नांचे निराकारण करण्यातच आयोगाचा फायदा आहे.

थरूर म्हणाले की, माझ्यासाठी हा मुद्दा खूप सोपा आहे. राहुल गांधी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर त्यांना गंभीर उत्तरं देणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं की, निवडणूक आयोगाची केवळ देशाप्रती जबाबदारी नाही तर आयोगाची स्वतःचीही जवाबदारी आहे की निवडणुकांच्या विश्वासार्हतेबाबत लोकांच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका राहू नये असेही थरूर म्हणाले.