पुठ्ठयांच्या मखरे, कागदी फुले, मण्यांचे हार, मखमली पडदे बाजारात

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी रत्नागिरीतील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. प्लॅस्टीक आणि थर्माकोलबंदीमुळे बाजारात पुठ्ठयांच्या मखरे, कागदी फुले, मण्यांचे हार विक्रीसाठी दाखल झाले आहेत. गणेशोत्सवासाठीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी सुरू झाली आहे.

प्लॅस्टीक आणि थर्माकोलबंदीमुळे यंदा गणेशोत्सवातील सजावटीवर त्याचा परिणाम झाला आहे.
थर्माकोल बंदीमुळे सजावटीसाठी रंगीत पडद्यांना मागणी वाढली आहे. साडेसातशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत पडदे बाजारात विक्रीसाठी उपल्बध आहेत. काही मखमली पडदे खरेदीदारांना आकर्षित करत आहेत.रंगबेरंगी फुले अडकवून सजावट करण्यासाठी फोन बाजारात आले आहेत. कापडी फुलांच्या माळा वीस रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत उपल्बध आहेत. यंदा गणेशोत्सवात रंगीत, मखमली पडदे आणि फुलांच्या माळा असे समीकरण पहायला मिळणार आहे.

ऋण काढून सण साजरा
प्लॅस्टीक आणि थर्माकोलबंदीमुळे यंदा पर्यायात वस्तूंच्या किमंती वाढल्या आहेत.पुठ्ठा आणि लाकडापासून बनवलेली मखरे बाजारात आली असली तरी त्याच्या किंमती सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या नाहीत. बाजारात गणेशोत्सवाच्या खरेदीची जोरात लगबग सुरु आहे. सुगंधी अगरबत्या, विद्युत रोषणाईच्या माळा बाजारात पहायला मिळतात. धूप आणि कापूराचे दर वाढले आहेत. वाढत्या महागाईच्या काळात ऋण काढून सण साजरा करण्यासाठी कोकणी माणूस सज्ज झाला आहे.