आर्थिक सर्वेक्षणात रामायणातील युद्धकांडाचा दाखला, शत्रूपासूनही ज्ञानप्राप्तीचा प्रभू श्रीरामांचा दृष्टिकोन, चीनचे दिले उदाहरण

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणात रामायणापासून प्रेरणा घेत हिंदुस्थानच्या आत्मनिर्भरतेवर जोर देण्यात आला आहे. प्रभू श्रीराम यांनी पराभूत केलेल्या शत्रूपासून देखील ज्ञानप्राप्तीचा विचार केला होता. त्यापासून प्रेरणा घेत हिंदुस्थान आपल्या विरोधी देशांपासून कशा प्रकारे शिकता येईल यावर भर देण्यात आला आहे. याचा कटाक्ष हा चीनकडे असून चीनने हैनान फ्री ट्रेड पोर्टनिर्माण केल्याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

आर्थिक सर्वेक्षण 2025-26मध्ये रामायणापासून प्रेरणा घेत काही महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. रामायणमधील युद्धकांडाचा उल्लेख करत म्हटले आहे, की प्रभू श्रीरामांनी पराजित शत्रूपासून देखील ज्ञानप्राप्तीचा विचार केला. इतरांवर अवलंबून न राहता आपल्या विरोधी देशांपासून कसे शिकता येईल, आपली स्वायत्तता कमकुवत न होऊ देता आवश्यक पण निवडक ज्ञान कसे प्राप्त करता येईल, यावर जोर देण्यात आला आहे. आजच्या वाढत्या भूराजकीय तणाव, अस्थिर आर्थिक परिस्थिती आणि जागतिकीकरणाच्या जुन्या विचारांना कमकुवत होत असल्याच्या परिस्थितीचे महत्त्वपूर्ण आकलन यातून करण्यात आले आहे.

चीनच्या हैनान पोर्टचे उदाहरण

चीनने वर्ष 2025च्या अखेरीस हैनानमध्ये फ्री ट्रेड पोर्टचा शुभारंभ केला. संपूर्ण प्रदेश कमी टॅरिफ असलेला सेवेवर आधारित आर्थिक झोन बनवण्यात आला. या ठिकाणी चीनपेक्षा संपूर्ण वेगळी सीमा शुल्क यंत्रणा आहे. तेथे आयातीवर अतिशय कमी टॅरिफ असून स्थानिक उत्पादनांना अतिरिक्त टॅरिफविना संपूर्ण चीनमध्ये विक्री करण्यास परवानगी आहे.

हैनानवरून इशारा

हैनानकडे फक्त एक मोठा अडथळा म्हणून पाहायला नको, असे म्हणत आर्थिक सर्वेक्षणातून हिंदुस्थानला एक इशारा देण्यात आला आहे. हैनान एका बदलाचे प्रतिनिधित्व करतो. दक्षिण चीनच्या सागरी क्षेत्रातील व्यापारी मार्ग, लॉजिस्टिक नेटवर्क तसेच गुंतवणुकीला एक नवा आकार मिळू शकतो. याचा प्रभाव तत्काळ प्रतिस्पर्धेपेक्षा या क्षेत्राच्या आर्थिक भूगोलावर कसा परिणाम होतो यावर जास्त पडू शकतो.