प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- दिवाकर रावते

102

सामना प्रतिनिधी । अमरावती

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळाला किंवा कसे, हे काटेकोरपणे तपासावे. त्यासाठी आवश्यक पाहणी करावी, तसेच यासंबंधी शेतकरी बांधवांच्या तक्रारी प्राप्त करुन घेऊन त्यांचे निराकरण करावे, असे निर्देश परिवहन व खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे दिले.

पीक विमा योजनेच्या अमरावती विभागातील अंमलबजावणीचा आढावा रावते यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. रावते म्हणाले की, नैसर्गिक संकटात सापडल्यास शेतकरी बांधवांना विमा संरक्षण व आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आली. त्याचा पात्र शेतकऱ्यांना लाभ विमा कंपन्यांकडून मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अशा तक्रारी प्राप्त करून त्याचा निपटारा तत्काळ करावा. पदाधिकारी व कार्यकत्र्यांकडूनही छावणी, प्रत्यक्ष संवाद आदींद्वारे या बाबींचा पाठपुरावा करण्यात येईल.

ते पुढे म्हणाले की, काही तालुक्यांत एकाही शेतक-याला नुकसानभरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे ही सबंध प्रक्रिया पुन्हा काटेकोरपणे तपासावी. जिल्हास्तरीय सुकाणू समितीने वेळोवेळी बैठका व पाहणी करून योजनेची योग्य अंमलबजावणी होते का, हे तपासावे. विमा हा पीक कापणी प्रयोगाधारे निश्चित होत असल्याने प्रयोग प्रक्रिया परिपूर्ण व पारदर्शकपणे राबवली जावी. महसूल मंडळांत पीक कापणी प्रयोग करण्यापूर्वी दवंडी पिटून माहिती द्यावी. कंपन्यांकडून विम्याची रक्कम मंजूर होऊन सर्व जिल्ह्यांत ती पोहोचली किंवा कसे, हेही तपासण्यात यावे. पात्र शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले, तेवढी भरपाई त्यांना मिळालीच पाहिजे.

अमरावती जिल्ह्यात खरीप हंगाम २०१७-१८ या वर्षात १ लाख ७ हजार १२३ शेतकरी योजनेत सहभागी झाले व ४५ हजार ६७१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. २०१८-१९ या वर्षात १ लाख ३८ हजार ६५६ शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाल्याचे इंगळे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या