जम्मू-काश्मीरमध्ये कार दरीत कोसळली; एकाच कुटुंबातील 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात कार दरीत कोसळून एकाच कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. मृतांमध्ये एक पुरुष, दोन स्त्रिया आणि पाच बालकांचा समावेश आहे. अनंतनाग जिल्ह्यातील दक्सूम परिसरात ही घटना घडली. अपघाताची माहिती कळताच जम्मू-काश्मीर पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कुटुंब टाटा सुमो कारने किश्तवार येथून परतत होते. यावेळी अनंतनाग जिल्ह्यातील दाक्सूम परिसरात गाडी अनियंत्रित झाली आणि दरीत कोसळली. अपघातस्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.