
बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच एक वेगळे चित्र दिसले. ‘राष्ट्रीय जनता दल’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना व्हीलचेअरवरून विधानमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये नेण्यात आले. याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली. तेजस्वी यादव यांच्या प्रकृतीबाबत तर्कवितर्क लढवले जात असताना आरजेडीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 फेब्रुवारी पासून सुरू झाले असून 3 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री बिजेंद्र प्रसाद यादव वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करतील. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तेजस्वी यादव व्हीलचेअरवर बसून विधानसभेत पोहोचले. याचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आरजेडीचे काही कार्यकर्ते, नेते आणि पोलीस कर्मचारी त्यांच्या व्हीलचेअरला धक्का देत असल्याचे दिसते. पायऱ्या येतात तेव्हा पोलीस कर्मचारी तेजस्वी यादव यांना व्हीलचेअरसोबत उचलून घेतात.
दरम्यान, तेजस्वी यादव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. मात्र घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे आरजेडीने स्पष्ट केले. तेजस्वी यांच्या पायाला दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरजेडीने दिली.
#WATCH | Patna | Bihar Assembly LoP Tejashwi Yadav brought to the Legislative Assembly budget session on a wheelchair with a visible injury on his left toe.
He says, “The nail came off… These things happen sometimes…” pic.twitter.com/lVXp5D0pWC
— ANI (@ANI) February 2, 2026
पक्षाने आपल्या अधिकृत पोस्टमध्ये म्हटले आहे की, 25 जानेवारी रोजी पाय अडखळल्यामुळे तेजस्वी यादव यांच्या पायाच्या अंगठ्याचे नख उखडले गेले होते. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे.

























































