
>> एकनाथ आव्हाड
आज संध्याकाळी ऋषिकेश त्याच्या वाढदिवसाची खरेदी करण्यासाठी आई-बाबांसोबत बाहेर जाणार होता. नवीन कपडे घ्यायचे होते आणि विशेष म्हणजे शाळेत त्याला येण्या-जाण्यासाठी नवीन सायकल घ्यायची होती. म्हणून रस्त्याने तो झपझप पावले टाकीत आनंदाने घराकडे निघाला.
रस्त्याने तो जात असताना वाटेत नेमका त्याला त्याच्या वर्गात शिकणारा रोहिदास दिसला. एका आजारपणात त्याच्या दोन्ही पायातली ताकद गेली होती. तो उभा राहू शकत नव्हता. म्हणून तीन वर्षांपासून तो तीन चाकाच्या सायकलने शाळेत येत-जात होता. स्वभावाने गरीब. आपली शाळा भली आणि आपले घर भले एवढेच त्याचे विश्व. तो फारसा कोणात मिसळायचा नाही.
मध्येच रस्त्याची चढण लागली. रोहिदास त्याची तीन चाकांची सायकल जिवाच्या आकांताने अगदी कष्टाने चढणीवरती चढवत होता. ऋषिकेशने हे पाहिले. धावतच तो रोहिदासकडे गेला आणि पाठीमागून त्याच्या सायकलला ढकलत त्याची सायकल चढणीवरती सहजपणे चढण्यासाठी तो मदत करू लागला. ऋषिकेशच्या मदतीमुळे रोहिदासला आता सायकल हाताने चालवण्यासाठी फार कष्ट पडत नव्हते. चढणीवरचा सगळा रस्ता पार केल्यानंतर रोहिदासने सायकल रस्त्याच्या एका बाजूला थांबवली. त्याने ऋषिकेशचे आभार मानले आणि म्हणाला, “अरे, ही सायकल खूप जुनी झालीय ना. हल्ली रस्त्यावर चढणीवरती असाच त्रास देते. बाबा म्हणालेत माझे की, आपण पुढच्या वर्षी नवीन सायकल विकत घेऊ म्हणून.’’
“पुढच्या वर्षी? म्हणजे एक वर्षानंतर. मग तोपर्यंत?’’
रोहिदास कसंनुसं हसत म्हणाला, “तोपर्यंत आहे की ही सायकल. उताराच्या वेळी नाही त्रास काही. चढणीच्या वेळी होतो थोडा त्रास, पण आता त्याचीही सवय झालीय मला. बरं ते जाऊ दे. चल निघतो आता मी. खरंच, पुन्हा एकदा तुझे आभार.’’
ऋषिकेशला पुढे काय बोलावे ते कळेना. दोघे एकमेकांचे निरोप घेऊन आपापल्या वाटेला लागले. आपण घाईत रोहिदासला आपल्या वाढदिवसाचे आमंत्रण द्यायला विसरलो याची चुटपुट ऋषिकेशला लागली.
ऋषिकेश घरी आला. आईने त्याच्या वाढदिवसासाठी बरेच पदार्थ तयार केले होते. आज बाबाही घरीच होते. ऋषिकेशने हातपाय, तोंड धुतल्यानंतर आई-बाबांना रोहिदासची सगळी हकिगत सांगितली. शाळेतून घरी जाताना रस्त्यावर चढणीवरती त्याला कसा त्रास होतो, तेही आवर्जून सांगितलं. आई-बाबांना वाईट वाटले, पण ते तरी करणार काय.
संध्याकाळी आई-बाबा ऋषिकेशला त्याच्या वाढदिवसाची खरेदी करण्यासाठी बाजारात घेऊन जायला निघाले.
पण ऋषिकेश म्हणाला, “आई-बाबा, या वाढदिवसाला नकोत मला नवीन कपडे आणि वाढदिवससुद्धा आपण साध्याच पद्धतीने घरातच साजरा करू. आपण पैशांची बचत करू आणि हो, मला वाढदिवसाला दुचाकी सायकल नको, तिचाकी सायकल हवी.’’
“तीन चाकाची सायकल? ती कशासाठी?’’ बाबांनी विचारले.
“बाबा, ही तिचाकी सायकल आपण रोहिदाससाठी विकत घेऊ. अहो, त्याची सायकल खूप जुनी झालीय.’’
थोडा विचार करून शेवटी बाबा म्हणाले, “अरे, ते नंतर बघू. आधी आपण तुझ्या वाढदिवसाची खरेदी करायला बाहेर तर जाऊ. तू लवकर तयार हो बरं. रोहिदासच्या घरी फोन आहे का रे? त्यालाही फोन कर. त्यालाही सोबत घेऊन जाऊ. तुझ्यासोबत त्यालाही नवीन कपडे घेऊ.’’
ऋषिकेशने रोहिदासला फोन केला. सगळे मिळून वाढदिवसाच्या खरेदीला बाहेर पडले. बाबांनी दोघांनाही नवीन कपडे घेतले. नंतर बाबा सगळ्यांना घेऊन सायकलच्या दुकानात गेले. जिथे दिव्यांग मुलांसाठी तीन चाकांच्या आधुनिक सायकली मिळतात. बाबांनी घरातून निघतानाच त्या दुकानाची, त्या सायकलची सगळी माहिती फोनवरून काढून ठेवली होती. त्या सायकलच्या दुकानात शिरताना मात्र ऋषिकेशच्या गालावरची खळी खुलली. बाबांनी रोहिदासला ज्या सायकलची खरी गरज आहे ती तिचाकी सायकल खरेदी केली. रोहिदास मात्र सायकल नकोच म्हणत होता.
आज खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या वाढदिवसाची सुंदर भेट मिळाली या विचाराने ऋषिकेशला खूप आनंद झाला. अडचणीच्या वेळी इतरांच्या मदतीला धावून जाण्याची आपल्या मुलाची कृती पाहून ऋषिकेशच्या आई-बाबांना तर ऋषिकेशचा खूप खूप अभिमान वाटला.