कोणाला तिकीट द्यायचे हे सांगणार नाही, पक्षाचा निर्णय मान्य! एकनाथ खडसे

8555

‘मला तिकीट का देण्यात आलं नाही? याचं कारण कळालं तर बरं होईल’ असं विधान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे. खडसे यांना भाजपने उमेदवारी जाहीर न केल्याने मुक्ताईनगरमध्ये खडसे समर्थकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये खडसेंना तिकीट न दिल्याबद्दल उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. समर्थकांनी मते मांडल्यानंतर एकनाथ खडसे यांनीही त्यांची भूमिका मांडली.

एकनाथ खडसे यांना पक्षाने तिकीट न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याऐवजी खडसे यांनी उमेदवार सुचवावा, त्या उमेदवाराला तिकीट देण्यात येईल असं भाजपने एकनाथ खडसे यांना कळवले आहे. ‘पक्षाचा निर्णय मान्य आहे, मात्र मी का नको हे सांगितलं तर बरं होईल’ असं खडसे म्हणाले. ‘जर पक्षाने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तरी चालेल, कारण मी काही एवढा मोठा माणूस नाही’ असे उद्गारही त्यांनी काढले

पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, यापूर्वी पक्षाने सांगितलं म्हणून मी मंत्रिपदाचा एका मिनिटात राजीनामा दिला होता असं एकनाथ खडसे म्हणाले. कार्यकर्त्यांनी यावेळी खडसेंनी अपक्ष लढावं अशीही विनंती केली. यावर बोलताना खडसे म्हणाले की पक्षाने अजून निर्णय जाहीर केलेला नाही, पक्ष योग्य तो निर्णय घेईल. भाजपने उमेदवारांच्या 2 याद्या आतापर्यंत जाहीर केल्या आहेत. यामध्ये एकनाथ खडसे यांचे नाव नसल्याने काहींनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भाजपची तिसरी यादी जाहीर होणं अद्याप बाकी आहे. या यादीमध्ये तरी खडसे यांना स्थान मिळते का याकडे आता खडसे समर्थकांचे लक्ष आहे. भाजपने उमेदवारी जाहीर केली नसली तरी एकनाथ खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने उमेदवारी न दिल्यास खडसे अपक्ष निवडणूक लढवू शकतात असे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या