अरे वाचाळविरा.. एकनाथ शिंदेंच्या जाचाला कंटाळून काँग्रेसमध्ये जाणार होतास.. विसरू नकोस.. शिवसेना नेते राजन विचारे यांचे मिंधे खासदार नरेश म्हस्केंना जोरदार तडाखे

शिवसेना काँग्रेसच्या वळचणीला गेल्याची टीका करता.. अरे वाचाळविरा.. एकनाथ शिंदेंच्या जाचाला कंटाळून तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होतात.. हे आठवते का? त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर मी तुम्हाला शिवसेनेत परत आणले याचा विसर पडू देऊ नका, असे जोरदार तडाखे शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी मिंधे खासदार नरेश म्हस्के यांना लगावले. तुम्ही सध्या ज्यांचे मीठ खाता त्यांचीसुद्धा निंदानालस्ती करता, ज्या ताटात खाता त्याच ताटात घाण करता अशी तुमची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला आहे. त्यामुळे सुसंस्कृत राजकारण करा, तुमचे पुस्तक उघडायला लावू नका, असे खडेबोलही विचारे यांनी सुनावले.

पहेलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदुस्थानींची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या दहशतवाद्यांबद्दल वेंद्रसरकारने सारवासारवीची उत्तरे दिली. त्यावर राजन विचारे यांनी केलेले वक्तव्य ठाण्यातील मिंधेंच्या बगलबच्च्यांनी मोडतोड करून दाखवले. जनतेची दिशाभूल करणाऱ्या मिंधे खासदारांचा राजन विचारे यांनी अनावृत्त पत्र लिहून कडकडीत समाचार घेतला. ते म्हणाले, तुमच्यासारख्या लबाडाने खासदारकीची निवडणूक कशी जिंकली हे सर्वांना माहीत आहे. बोगस मतदार नोंदणी करून विजय मिळवलात याचाही भंडाफोड लवकरच होईल, असेही विचारे यांनी ठणकावले.

शिवसेना आणि ठाकरे बॅण्डबद्दल बोलताना तुमची औकात विसरू नका
दुसऱ्यांच्या विकासाच्या कल्पना चोरणारे आणि दुसऱ्याच्या आयडिया स्वतःच्या नावावर खपवणारे अशी तुमची ओळख आहे. तुम्ही इकडून तिकडे उड्या मारता हे ठाणेकरांना माहिती आहे. इतकीच खुमखुमी असेल तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर देईन. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः ठाण्यात आले आणि तुम्हाला महापौर खुर्चीत बसवले, याची जाणीव ठेवणार की नाही, खाल्ल्या मिठाला जागणार की नाही. त्यामुळे खबरदार यापुढे शिवसेना, ठाकरे बॅण्ड आणि माझ्याशी बोलताना ‘तुमची औकात काय होती’ हे विसरू नका, असा इशारा विचारे यांनी दिला.

गद्दारी नसानसात भिनलेल्या तुमच्यासारख्यांनी आम्हाला देशभक्तीचे धडे देताना मी आजवर केलेल्या कामाची नुसती यादी आठवा म्हणजे तुम्हाला गद्दार कोण आणि देशप्रेमी कोण हे कळेल.
श्री मलंगगडावर इतक्या वर्षांत एकदा तरी पायी चढलात का? गडाखाली बसून खुशमस्कऱ्या आणि लावालावी करण्याचे तुमचे जुने धंदे आता सोडा.
टेंडर सेटर म्हणून तुमची ख्याती सर्वदूर आहे आणि वाचाळवीर बोलल्याने तुम्हाला मिरच्या झोंबल्या असतील तर मी बोललो ते खरेच आहे.